World Cup 2027 : वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत-पाकिस्तान संघात फक्त एक नाही, तर तीन मॅच होऊ शकतात, कसं ते समजून घ्या
वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असल्याने 10 ऑक्टोबरला दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र स्पर्धेच्या फॉरमॅटनुसार दोन्ही संघांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला आणि अव्वल 4 मध्ये स्थान मिळवलं, तर त्यांच्यात पुन्हा सामने होऊ शकतात.

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. कारण आज रोजी वर्ल्ड कप 2027 चे वेळापत्रक समोर आलं आहे. क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात मोठा सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत. आयसीसीच्या नव्या फॉरमॅटनूसार 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी तब्बल तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात. क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. आपण हा संपूर्ण फॉरमॅट आणि गणित समजून घेऊया.
पहिला सामना 10 ऑक्टोबरला
2027 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना ग्रुप ए मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान झिम्बाब्वे आणि क्वालिफायर ए मधून येणारा संघ असेल. भारताची पहिली मॅच 7 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 10 ऑक्टोबरला जोहान्सबर्ग येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला सामना खेळवला जाईल.
सुपर सात मध्ये दुसरी लढत
वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजनंतर प्रत्येक गटातील टॉप तीन संघ आणि सर्वोत्तम चौथ्या क्रमांकाचा संघ सुपर सात फेरीत प्रवेश करतील. या फेरीत ग्रुप स्टेजचे गुण पुढे नेले जाणार नाहीत. सुपर सातची फेरी 25 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. भारतीय संघ आणि पाकिस्तानी संघाने या फेरीत धडक मारली तर 7 नोव्हेंबरला केपटाऊनमध्ये त्यांच्यात दुसरा सामना पाहायला मिळेल.
सेमीफायनल किंवा थेट फायनलमध्ये तिसरा सामना
सुपर सात मधील सामन्यांनंतर अव्वल चार संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पहिल्या चारमध्ये राहिले तर त्यांच्यात सेमीफायनल होऊ शकते. तसेच दोन्ही संघांनी आपापल्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवला तर 21 नोव्हेंबरला जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेतेपदासाठी ऐतिहासिक लढत होईल.
दोन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत अशा प्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यात जास्तीत जास्त तीन सामने होण्याची शक्यता आहे. ही संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाणार असून यामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढणार आहे.