Champions Trophy 2025 : उपांत्य फेरीतील 4 संघांनंतर आता प्रतिस्पर्धी फिक्स, कुणाचा कधी सामना?
CT 2025 Semi Final 4 Teams : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीनंतर उपांत्य फेरीत कोण कुणाविरुद्ध खेळणार? हे अखेर निश्चित झालं आहे. जाणून घ्या.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने यशस्वीरित्या पार पडले. या साखळी फेरीतील शेवटचा सामना रविवारी 2 मार्च रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने या सामन्यात न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी निश्चित झाले. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, टीम इंडिया आणि न्यूझीलंडने प्रेवश केला आहे. उपांत्य फेरीतील साने 4 आणि 5 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडिया सेमी फायनलमधील आपला सामना हा दुबईत खेळणार आहे. तर सेमी फायनलमधील दुसरी मॅच पाकिस्तानमध्ये होणार आहे.
2 गट आणि 4 संघ
ए आणि बी ग्रुपमधून प्रत्येकी 2-2 अशा एकूण 4 संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये नंबर 1 ठरली. तर न्यूझीलंडला दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. तर बी ग्रुपमधून दक्षिण आफ्रिका साखळी फेरीनंतर अव्वल ठरली. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे उपांत्य फेरीतील पहिला सामना अ गटातील अव्वल संघ विरुद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघात होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा हा सामना होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
दुसऱ्या सेमी फायनलमध्ये कोण?
ग्रुप बी मधील नंबर 1 टीम विरुद्ध ग्रुप ए मधील नंबर 2 टीम यांच्यात दुसरी सेमी फायनल खेळवण्यात येईल. या सामन्यात न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गाठ पडणार आहे. हा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये होणार आहे. उपांत्य फेरीतील निकालांवर अंतिम फेरीतील सामना कुठे होणार? हे निश्चित होईल. टीम इंडिया उपांत्य फेरीतील सामना जिंकली, तर अंतिम सामना दुबईत होईल. मात्र ऑस्ट्रेलिया विजयी झाली तर अंतिम सामना हा लाहोरमध्ये खेळवण्यात येईल.
चारही संघ चॅम्पियन्स
दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतील नवव्या पर्वातील उपांत्य फेरीत पोहचणारे चारही संघ चॅम्पियन्स आहेत. या चारही संघांनी किमान एक वेळ तरी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेने 1998 साली ही ट्रॉफी जिंकली. न्यूझीलंडने 2000 साली ही ट्रॉफी उंचावली. ऑस्ट्रेलियाने 2006 आणि 2009 साली अंतिम फेरीत विजय मिळवला. तर टीम इंडिया 2002 साली संयुक्तरित्या विजयी ठरली. तर 2013 साली महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडवर मात करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. आता यंदा ही ट्रॉफी कोण जिंकणार? हे लवकरच स्पष्ट होईल.
