
अहमदाबाद | वनडे वर्ल्ड कप 2023 महाअंतिम सामन्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा लागून राहिली आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये महामुकाबला आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यासाठी असंख्य क्रिकेट चाहते हे अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. टीम इंडिया तिसऱ्यांदा तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला आहे. त्यामुळे आता या सामन्याकडे साऱ्या विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. या सामन्यादरम्यान हवामान कसं असेल, हे आपण जाणून घेऊयात.
क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. वेदर फॉरकास्टनुसार, पावसाची शक्यता ही फक्त 1 टक्के आहे. त्यामुळे महाअंतिम सामन्यात पूर्ण 50-50 ओव्हरचा खेळ होईल, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. तसेच तापमान 33 ते 19 डिग्री इतकं असू शकतं. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये 10 ते 15 ताशी किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच पावसामुळे किंवा इतर काही कारणांमुळे सामना झाला नाही, तर राखीव दिवशी खेळ होईल. 20 नोव्हेंबर हा राखीव दिवस आहे.
या स्टेडियममध्ये एकूम 11 खेळपट्ट्या आहेत. खेळपट्टीत जास्त बाऊंस आहे, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत होईल. फलंदाजांसाठीही खेळपट्टी मदतशीर ठरेल. पहिले 10 ओव्हर्स निर्णयाक ठरतील. या स्टेडियममध्ये आतापर्यंत 30 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 15 सामने हे पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकले आहेत. तर दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या टीमने 15 सामने जिंकले आहेत. तसेच पहिल्या डावातील एव्हरेज स्कोअर हा 243 इतका आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनल 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, सीन एबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅलेक्स कॅरी आणि कॅमरून ग्रीन.