चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत पाकिस्तान संघ उतरणार मैदानात, अंतिम फेरीसाठी कर्णधार रिझवानकडे शेवटची संधी
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सर्वच संघ जोरदार सराव करत आहे. यासाठी वनडे मालिका खूपच महत्त्वाची ठरत आहे. स्पर्धेसाठी किती तयारी झाली आहे, यामुळे दिसत आहे. 12 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीत भाग घेणारे पाच संघ मैदानात उतरणार आहेत. यात पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. यात भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका या संघाचा सहभाग आहे. यापैकी पाच संघ 12 फेब्रुवारी वनडे सामना खेळताना दिसणार आहे. यात अंतिम फेरीसाठी दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तानमध्ये करो या मरोची लढाई असणार आहे. तर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका वनडे मालिकेत भिडणार आहे. खरं तर सर्वच संघांची या मालिकांमधून लिटमस टेस्ट होत आहे. कारण यानंतर टीम थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत उतरणार आहे. त्यामुळे काय घाम गाळायचा तो आताच गाळावा लागणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना 19 फेब्रुवारीला होणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा वनडे सामना
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. भारताने ही मालिका 2-0 ने आधीच खिशात घातली आहे. पण तिसरा आणि शेवटचा सामना औपचारिक असला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 12 फेब्रुवारीला हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय संघ इंग्लंडला व्हाईटवॉश देण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. तर इंग्लंड शेवटचा सामना जिंकून निदान शेवट गोड करण्याचा प्रयत्नात असेल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता आहे.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका वनडे सामना
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली. आता वनडे मालिकेत आपला दम दाखवण्यास सज्ज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा सामना ऑस्ट्रेलियासाठी खूपच महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, श्रीलंकेन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत पात्र होण्यास अपयशी ठरला आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता कोलंबोच्या आर प्रेमादास मैदानावर होणार आहे.
ट्राय सीरिजच्या अंतिम फेरीसाठी पाकिस्तान-दक्षिण अफ्रिका आमनेसामने
पाकिस्तानात ट्राय सीरिज सुरु असून या मालिकेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना शिल्लक आहे. न्यूझीलंडने दोन पैकी दोन सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकन संघात करो या मरोची लढाई आहे. जिंकणारा संघ अंतिम फेरीत न्यूझीलंडशी लढणार आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला हा सामना कराचीच्या नॅशनल बँक स्टेडियममध्ये अडीच वाजता खेळला जाणार आहे. त्यानंतर अंतिम फेरीचा सामना 14 फेब्रुवारीला होईल.
