IND VS SA: केएल राहुलचं शतक, अग्रवालचं सलग तिसरं अर्धशतक, पहिला दिवस भारताच्या नावावर

आजपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. आज सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IND VS SA: केएल राहुलचं शतक, अग्रवालचं सलग तिसरं अर्धशतक, पहिला दिवस भारताच्या नावावर
KL Rahul
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 10:34 PM

सेंच्युरियन : आजपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. आज सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीरांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. सलामीवीर के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी करत मोठ्या धावसंख्येच्या पाया रचला. (India vs south africa 1st test day 1: KL Rahul Century, Mayank Agarwal thirs fifty, virat kohli)

लुंगी एंगिडीने 41 व्या षटकात मयंक अग्रवालला पायचित करुन सलामीची जोडी फोडली. मयंकने 60 धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ एंगिडीने चेतेश्वर पुजाराला आल्या पावली माघारी धाडलं. पुजारा भोपळादेखील फोडू शकला नाही. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि राहुलने डाव सावरला. मात्र काही वेळातच भारताने विराट कोहलीच्या रुपात तिसरी विकेट गमावली. विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. चांगली सुरुवात होऊनही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याने 94 चेंडूत 35 धावांची खेळी केली. लुंगी एंगिडीने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. विराट बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या अजिंक्य रहाणे आणि राहुलने पुढे पडझड होऊ दिली नाही.

दरम्यान, राहुलने त्याचं शतक पूर्ण केलं. 78 व्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने शानदार चौकार वसूल करत आपलं शतक पूर्ण केलं. राहुलने 218 चेंडूत शतक केलं. त्यात 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. राहुल-अजिंक्य जोडी दिवसअखेर नाबाद परतली. राहुल सध्या 122 धावांवर खेळत आहे, तर अजिंक्य रहाणे 40 धावांवर खेळतोय.

दरम्यान, भारताचे तीनही फलंदाज लुंगी एंगिडीने बाद केले. त्याच्याव्यतिरिक्त साऊथ आफ्रिकेच्या कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. एंगिडीने 17 षटकात 45 धावात देत 3 बळी घेतले.

29 वर्षात सात दौऱ्यांमध्ये जे शक्य झालं नाही, ते शक्य करुन दाखवण्याचं टीम इंडियाचं लक्ष्य आहे. मजबूत इराद्यांसह कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरली. विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सलग दुसऱ्यांदा संघाचे नेतृत्व करत आहे. याआधी 2018 मध्ये त्याने नेतृत्व केले होते.

टेस्ट चॅम्पियनशीप गुणतालिकेत भारत चौथ्या स्थानी

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 च्या गुणतालिकेनुसार, भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. भारत आतापर्यंत सहा कसोटी सामने खेळला आहे. ज्यात तीन सामने जिंकले असून एकात पराभव झाला. दोन कसोटी ड्रॉ झाल्या.

कोरोनाच्या सावटाखाली कसोटी मालिका

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या सावटाखाली ही मालिका होत आहे. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत पहिली कसोटी खेळवली जात आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने ओमायक्रॉम व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन तिकीट विक्री केलेली नाही.

इतर बातम्या

Ind vs SA: दक्षिण आफ्रिकेच्या जखमेवर मीठ चोळत मयांकची अर्धशतकांची ‘हॅट्रिक’

IND vs SA: सामन्याआधी खेळाडूंनी पाळले मौन, यजमानांनी हातावर बांधली काळीपट्टी, जाणून घ्या कारण…

Ind vs SA: रोहित शर्माचा मित्रच सेंच्युरियनमध्ये भारतासाठी ठरु शकतो घातक, विराटलाही केलं होतं हैराण

India vs south africa 1st test day 1: KL Rahul Century, Mayank Agarwal thirs fifty, virat kohli)