IND vs SA : विंडीज विरुद्ध 126 धावा करणाऱ्या फलंदाजाचा पत्ता कट, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे आऊट

India vs South Africa 1st Test : वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या स्थानी बॅटिंग करणाऱ्या या युवा खेळाडूने एकूण 126 धावा केल्या होत्या. मात्र आता त्या फलंदाजाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून वगळलं आहे.

IND vs SA : विंडीज विरुद्ध 126 धावा करणाऱ्या फलंदाजाचा पत्ता कट, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे आऊट
Dhruv Shubman Kuldeep and Sai
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 14, 2025 | 11:55 AM

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हा कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने या सामन्यात नाणेफेक जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम मॅनेजमेंटने या सामन्यातून साई सुदर्शन याचा प्लेइंग ईलेव्हनमधून पत्ता कट केला आहे. साईने गेल्या कसोटी सामन्यात 100 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतरही साईला वगळण्यात आल्याने भारतीय खेळाडूंकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. साईच्या जागी नक्की कुणाला संधी दिलीय? तसेच साईने शेवटच्या कसोटीत किती धावा केल्या होत्या? हे जाणून घेऊयात.

साई सुदर्शनचा पत्ता कट

टीम इंडियाने आपली शेवटची मालिका वेस्ट इंडिज विरुद्ध खेळली होती. साई सुदर्शन विंडीज विरुद्ध दुसर्‍या आणि अंतिम सामन्यात खेळला होता. साईने या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. उभयसंघातील हा सामना 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. साईने या सामन्यातील पहिल्या डावात 165 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या होत्या. तर साईने दुसऱ्या डावात 76 बॉलमध्ये 5 फोरसह 39 रन्स केल्या होत्या. साईने अशाप्रकारे एकूण या सामन्यात 126 धावा केल्या. मात्र त्यानंतरही साईला दक्षिणे आफ्रिकेविरुद्ध संधी दिली गेली नाही. त्यामुळे साईला संधी न देण्याचा निर्णय चाहत्यांना काही पटलेला नाही.

वॉशिंग्टन सुंदर तिसऱ्या स्थानी खेळणार!

साई आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकीर्दीत तिसऱ्या स्थानी खेळला आहे. आता साईच्या जागी अर्थात तिसर्‍या क्रमांकावर चक्क ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर खेळणार आहे. टॉसनंतर शेअर करण्यात आलेल्या टीम शीटमध्ये सुंदरचं तिसऱ्या स्थानी नाव होतं. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

साईच्या जागी कुणाला संधी?

साई सुदर्शन याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये ऑलराउंडर अक्षर पटेल याला संधी देण्यात आली आहे. टीम इंडिया पहिल्या कसोटीत एकूण 4 फिरकीपटूंसह उतरली आहे. या चौघांमध्ये वॉशिंग्टन सुदंर, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे.

कगिसो रबाडा पहिल्या कसोटीतून बाहेर

दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याला सरावादरम्यान बरगडीला दुखापत झाली. रबाडाला या दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकावं लागलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागलाआहे.  आता दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज रबाडाच्या अनुपस्थितीत कशी कामगिरी करतात? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.