IND vs WI: लता मंगेशकर यांच्या निधनाचं टीम इंडियालाही दु:ख, काळीपट्टी बांधून मैदानात उतरला संघ

1000 वी वनडे खेळणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण असला, तरी आज एक दु:खद घटना घडली.

IND vs WI: लता मंगेशकर यांच्या निधनाचं टीम इंडियालाही दु:ख, काळीपट्टी बांधून मैदानात उतरला संघ
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 2:51 PM

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West Indies) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला वनडे सामना सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा हा 1000 वा वनडे (1000th ODI) सामना आहे. 1000 वी वनडे खेळणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण असला, तरी आज एक दु:खद घटना घडली. भारताच्या गान कोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज संपूर्ण भारत हळहळला. भारतीय संघानेही या महान गायिकेच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या या 1000 वनडे मॅचमध्ये भारतीय खेळाडू लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी दंडावर काळीपट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.

वयाच्या 92 व्या वर्षी लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या एक महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज संपूर्ण भारत दु:खात आहे. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

भारत-वेस्ट इंडिज सामन्यात काँमेंट्री करणारे क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. लता मंगेशकर यांचं क्रिकेटवरही प्रेम असल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्यांना क्रिकेट खूप आवडायचं. क्रिकेट सामने त्या आवर्जून पाहायच्या.