INDW vs ENGW T20 : शतकी खेळीसह स्मृती मंधानाने नोंदवला असा विक्रम, झालं असं की…

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात कर्णधारपदाची धुरा असलेली स्मृती मंधानाची बॅट चांगलीच तळपली. इंग्रजांना त्यांच्यात भूमीत तारे दाखवले. शतकी खेळीमुळे टीम इंडिया मजबूत स्थिती आहे.

INDW vs ENGW T20 : शतकी खेळीसह स्मृती मंधानाने नोंदवला असा विक्रम, झालं असं की...
शतकी खेळीसह स्मृती मंधानाने नोंदवला असा विक्रम, झालं असं की...
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 28, 2025 | 8:48 PM

भारत आणि इंग्लंड महिला संघात पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे खेळत नाही. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा स्मृती मंधानाच्या खांद्यावर आहे. स्मृती मंधानाने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांना फोडून काढलं. स्मृती मंधानाने शफाली वर्मासह पहिल्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मृती मंधानाने 51 चेंडूत शतक पूर्ण केलं. या खेळीत तिने 14 चौकार आणि तीन षटकार मारले. यावेळी तिचा स्ट्राईक रेट 194.3 चा होता. भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारी दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी अशी कामगिरी कर्णधार हरमनप्रीत कौर हीने केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणारी 18 वी फलंदाज ठरली आहे.

वेस्ट इंडिजच्या डॉटीनने 2010 मध्ये पहिलं शतक ठोकलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मेग लेनिंगने 2014 मध्ये 126 धावा, हरमनप्रीत कौरने 2018 मध्ये 103 धावा, इंग्लंडच्या हीथर नाईटने 2020 मध्ये 108 धावा, दक्षिण अफ्रिकेच्या लीने 2020 मध्ये 101 आणि पाकिस्तानच्या मुनीब अलीने 2023 मद्ये 102 धावा केल्या होत्या. आता या यादीत स्मृती मंधानाची भर पडली आहे. टी20 करिअरमधील स्मृती मंधानाचं हे पहिलं शतक आहे. यासह तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. हीथर नाईट, टॅमी ब्यूमोंट, लॉरा वोल्वार्ड्ट, बेथ मूनी यांनी तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकलं आहे.

स्मृती मंधाना 62 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकार मारून 112 धावा करून बाद झाली. यासह टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू ठरली आहे. तर डॉटीनसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. मेग लेनिंग 126 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. दरम्यान, भारताने 20 षटकात 5 गडी गमवून 210 धावा केल्या आणि विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं आहे. आता इंग्लंडचा संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.