
मुंबई: IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) ज्या प्रदर्शनाची अपेक्षा केली जात होती, तशी कामगिरी हा संघ करु शकलेला नाही. सलग आठ पराभवानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने विजयाचं खात उघडलं. या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही आघाड्यांवर थोडी चांगली कामगिरी झाली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सहा विकेट गमावून 158 धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. या सामन्यादरम्यान मुंबईच्या दोन गोलंदाजांनी प्रभावित केलं. यात एक ऑफस्पिन्र ऋतिक शौकीन आणि दुसरा कार्तिकेय सिंह (Kumar Kartikeya) आहे. हे दोघांनी मुंबईच्या स्पिन गोलंदाजीची धुरा वाहण्याची अपेक्षा निर्माण केली आहे.
या सीजनमध्ये मुंबईकडे एकही फ्रंटलाइन स्पिन्र नाहीय. राहुल चाहर मागच्या सीजनपर्यंत मुंबई इंडियन्सकडे होता. पण या सीजनमध्ये तो पंजाब किंग्सकडून खेळतोय. कृणाल पंड्या आता लखनौकडून खळतो. मुंबईने मुरुगन अश्विन आणि मयांक मार्केंडे दोघांना संधी दिली. पण दोघेही प्रभावित करु शकले नाहीत.
कार्तिकेयने शनिवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध डेब्यु केला. हा फिरकी गोलंदाज मध्य प्रदेशकडून आतापर्यंत आठ सामने खेळला आहे. आपल्या पहिल्या सामन्यात दुसऱ्या चेंडूवर विकेट घेण्यात कार्तिकेय यशस्वी ठरला. तो आठव षटक टाकत होता. त्याने राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला बाद केलं. त्यानंतर कार्तिकेय विकेट मिळवू शकला नाही. पण त्याने राजस्थानच्या फलंदाजांना सहजासहजी धावही करु दिल्या नाहीत. आपल्या कोट्यातील चार षटकात 19 धावा देत त्याने एक विकेट घेतला.
कार्तिकेयच्या गोलंदाजीमुळे मुंबईला दिलासा मिळाला. पारंपारिक चायनामन गोलंदाजीशिवाय कार्तिकेयकडे व्हेरिएशन आहे. तो चेंडूला चांगला फ्लाइट देतो. लेग स्पिन, गुगली शिवाय सरळ चेंडू सुद्धा टाकतो. व्हेरिएशन्समुळे तो मिस्ट्री गोलंदाज ठरला आहे.
गोलंदाजीतील वैविध्य समजून घेणं, फलंदाजाला कठीण जातं. गोलंदाजीशिवाय कार्तिकेयच्या आणखी एका गोष्टीने प्रभावित केलय, तो म्हणजे त्याचा आत्मविश्वास. “तो काय गोलंदाजी करतोय, हे समजून घेण्यासाठी सात चेंडू खेळावे लागले. डावखुरी गोलंदाजी करताना, तो स्पिन, सीम बॉलिंग, कॅरम बॉल असे सगळ्याच प्रकारचे चेंडू टाकतो. फलंदाज तो खराब चेंडू कधी टाकतोय, त्याची वाट पहात होते. मिचेल आणि बटलरला त्याची गोलंदाजी खेळणं कठीण गेलं” असं न्यूझीलंडचे महान फिरकी गोलंदाज डॅनियल विटोरी म्हणाले.