
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात प्रतिष्ठेचा सामना रंगला. हा सामना दोन्ही संघांना किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज गुणतालिका पाहूनच येते. नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान होतं. मुंबई इंडियन्सची सुरुवातही चांगली झाली. विराट कोहली आणि विल जॅक्स स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर रजत पाटीदार आणि फाफ डू प्लेसिस यांनी सावध खेळी करत संघाचा डाव पुढे नेला. दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर निर्णायक क्षणी अर्धशतक झळकावली. फाफने 40 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. तर रजत पाटीदारने 26 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. पण त्यानंतर विकेट्सची लाईन लागली. मॅक्सवेलला आपलं खातंही खोलता आलं नाही. महिपाल लोमरोर, सौरव चौहान, विजयकुमार विशक स्वस्तात बाद झाले. पण एका बाजून दिनेश कार्तिकने किल्ला लढवला.
दिनेश कार्तिकने 23 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या. यामुळे संघाला 20 षटकात 196 धावांपर्यंत मजल मारण्यात मदत झाली. दिनेश कार्तिकने आकाश मढवालला एका षटकात 4 चौकार ठोकले. त्याची ही खेळी पाहून रोहित शर्माही आश्चर्यचकीत झाला. त्यामुळे त्याने दिनेश कार्तिकची थट्टा मस्करी करण्याची संधी सोडली नाही. रोहित शर्मा जवळ गेला आणि टाळ्या वाजवत म्हणाला की, “वर्ल्डकप खेळायचं आहे, वर्ल्डकप खेळायचं आहे. शाब्बास..डोक्यात वर्ल्डकप सुरु आहे.” त्याचं हे स्टेटमेंट पाहून इशान किशनलाही हसू आलं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rohit Sharma to Dinesh Kartik- Worldcup khelna h Worldcup 😂😂 pic.twitter.com/mLCELhbslE
— Nobita3.0 (@NobitaPrince45) April 11, 2024
रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी आपआपल्या पद्धतीने या व्हिडीओवर कमेंट्स देत आहेत. रोहित शर्माचा हा अंदाज पाहून अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. पण दिनेश कार्तिकने फिल्डवर याचा काहीही रिप्लाय दिला नाही. त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं. आकाश मढवालची शेवटच्या षटकातही धुलाही केली. टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार आहे. यासाठी संघाची निवड 30 एप्रिल किंवा 1 मेला होणार आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मढवाल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.