IPL 2024, Point Table : तीन संघांचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित, तर दोन टीमचं पॅकअप!

| Updated on: Apr 23, 2024 | 3:59 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 38 सामने पार पडले आहेत. यात काही संघांनी चांगली, तर काही संघांच्या पदरी निराशा पडली आहे. आता प्लेऑफच्या दृष्टीने काही संघांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. तर काही संघांचा पत्ता कट होण्याच्या मार्गावर आहे. चला जाणून घेऊयात कोणाला प्लेऑफमध्ये संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार ते

IPL 2024, Point Table : तीन संघांचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित, तर दोन टीमचं पॅकअप!
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत साखळी फेरीतील 32 सामने शिल्लक आहेत. स्पर्धेचा अर्धा टप्पा पार झाला असताना प्लेऑफचं चित्रही स्पष्ट होताना दिसत आहे. अजूनही कोणत्याही संघाचं प्लेऑफमधलं स्थान निश्चित नाही. मात्र सध्याचं गणित पाहता काही संघांना प्लेऑफमध्ये जागा मिळेल. तर काही संघाचं स्पर्धेतून बाद होणं आता फक्त औपचारिकता आहे. सध्याची गुणतालिका पाहता तीन संघांचं प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. तर दोन संघांना आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. पण असं असलं तरी दहाही संघांच्या आशा जिवंत आहेत. कधी काय चमत्कार होईल सांगता येत नाही. आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कमीत कमी 16 गुणांची आवश्यकता आहे. म्हणजेच प्रत्येक संघाला आपल्या 14 पैकी 8 सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत स्पर्धेत सातवा विजय मिळवला आहे. राजस्थान रॉयल्स संघ 14 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे उर्वरित 6 पैकी एका सामन्यात विजय मिळवला की स्थान पक्क होणार आहे.

राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनाही प्लेऑफची संधी आहे. दोन्ही संघांनी सात सामने खेळले असून पाच सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी 10 गुण असून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. अजून उर्वरित 7 सामन्यापैकी 3 सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. पण आता चौथ्या क्रमांकासाठी पाच संघांमध्ये चुरस असणार आहे.सध्या चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स असून 8 गुण आहेत. अजून सात सामने शिल्लक आहेत.

लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांचेही प्रत्येकी 8 गुण आहेत. पण नेट रनरेटच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्स वरचढ आहे. तर चेन्नई आणि लखनौला अजून सात सामने खेळायचे आहेत. तर गुजरात टायटन्सचे 6 सामने शिल्लक आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रत्येकी सहा गुण असून गुणतालिकेत सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत. या दोन्ही संघाचे 6 सामने शिल्लक असून त्यात विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये स्थान मिळेल.

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. एखाद दुसऱ्या पराभवानंतर सध्याचं गणिती चित्रंही संपुष्टात येईल. पंजाबने 8 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर आरसीबीने 8 फैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या संघांचं पुढचं गणित सुटणं खूपच कठीण आहे.