आयपीएलमधील या सामन्याचं शेड्युल बदललं जाण्याची दाट शक्यता, कारण की…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयला आयपीएलचं वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर करावं लागलं होतं. आता स्पर्धेतील एका सामन्यावर सावट पसरलं आहे. हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाण्याची शक्यता वाढली आहे. तसेच ट्रान्सफर करण्याची वेळ येऊ शकते.

आयपीएलमधील या सामन्याचं शेड्युल बदललं जाण्याची दाट शक्यता, कारण की...
| Updated on: Apr 01, 2024 | 5:31 PM

आयपीएल 2024 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेळापत्रक व्यवस्थितरित्या बसवण्यात आलं आहे. तसेच ठरलेल्या वेळेप्रमाणे सामने होत आहेत. स्पर्धेत आतापर्यंत एकूण 13 सामने पार पडले आहेत. तसेच पुढचे सामनेही ठरलेल्या वेळेप्रमाणे होणार आहेत. असं असताना एका सामन्यावर संशयाचं दाट धुकं जमा झाल आहे. या सामन्यांचं ठिकाण किंवा तारीख बदलली जाण्याची शक्यता आहे. त्याला कारणंही तसंच आहे. मात्र बीसीसीआयकडून याबाबत अद्याप अधिकृत असं काही सांगण्यात आलेलं नाही. 17 एप्रिलला कोलकात्याच्या ईडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याच्या आयोजनावर सस्पेंस आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार बीसीसीआय हा सामना कुठेतरी इतरत्र हलवण्याचा विचार करत आहे. याबाबतचे संकेत फ्रेंचायसी, स्टेट क्रिकेट आणि ब्रॉडकास्टर्स यांना दिले आहेत.

17 एप्रिलला रामनवमीचा उत्सव आहे. हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी दूर्गा पूजेचा कार्यक्रम कोलकाता आणि पूर्ण पश्चिम बंगालमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे पोलीस सुरक्षा पुरवली जाईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे संपूर्ण चित्र अस्पष्ट आहे. तसेच देशात इतर ठिकाणी लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमी असणार आहे. त्यामुळे बीसीसीआय हा सामना स्थगित करण्याचा विचार करत आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआय या सामन्यासाठी सीएबी अर्थात एसोशिएशन ऑफ बंगालच्या संपर्कात आहे.

17 तारखेच्या सामन्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं बोललं जात आहे. तसेच याबाबत राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या स्टेक होल्डर्संना सांगितलं गेलं आहे. पण याबाबत अजूनपर्यंत तरी बीसीसीआयने काही स्पष्टपणे सांगितलेलं नाही. स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि पोलिसांच्या निर्णयानंतरच बीसीसीआय पाऊल उचलेल, असं सांगण्यात येत आहे.

बीसीसीआयने आयपीएलच्या 70 सामन्यांचं वेळापत्रक निश्चित केलं आहे. तर उर्वरित प्लेऑफ आणि फायनल सामन्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र कुठे होतील याबाबत सांगितलेलं नाही. प्लेऑफचे सामने 21 मे आणि 22 मे ला होतील. तर अंतिम फेरीचा सामना 24 मे रोजी असणार आहे. तर साखळी फेरीत प्रत्येक संघ एकूण 14 सामने खेळणार असून 19 मे रोजी हा थरार संपेल.