
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 17 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदानात 25 धावांनी पराभूत केलं आहे. दिल्लीने चेन्नईला विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांसमोर चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 158 धावाच करता आल्या. दिल्लीने यासह विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. तसेच दिल्ली सीएसकेला चेन्नईत 15 वर्षांनंतर पराभूत करण्यात यशस्वी ठरली. तर चेन्नईचा हा या मोसमातील एकूण आणि सलग तिसरा तर घरच्या मैदानातील दुसरा पराभव ठरला. महेंद्रसिंह धोनी आणि विजय शंकर ही जोडी शेवटपर्यंत मैदानात होती. त्यामुळे या जोडीकडून यलो आर्मीला आशा होती. मात्र हे दोघे चेन्नईला विजयी करण्यात अपयशी ठरले.
चेन्नईची विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना काही खास सुरुवात झाली नाही. दिल्लीने चेन्नईला ठराविक अंतराने झटके दिले. रचीन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड या दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. रचिनने 3 तर ऋतुराजने 5 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. डेव्हॉन कॉनव्हे 13 धावांवर बाद झाला. ऑलराउंड शिवम दुबेने निराशा केली. शिवमला अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र तो 18 रन्स करुन आऊट झाला. तर रवींद्र जडेजाने 2 धावा जोडल्या. त्यामुळे चेन्नईची 10.4 ओव्हरमध्ये 5 आऊट 74 अशी स्थिती झाली.
त्यानंतर विजय शंकर आणि महेंद्रसिंह धोनी या जोडीने चेन्नईला सामन्यात कायम ठेवलं. त्यामुळे या दोघांकडून अनेक आशा होत्या. मात्र या दोघांना अपेक्षित रनरेटने धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे चेन्नई विजयापासून दूरच राहिली. शंकर-धोनीने सहाव्या विकेटसाठी 84 धावांची नाबाद भागीदारी केली. मात्र ही भागीदारी चेन्नईला विजयी करु शकली नाही. धोनीने 26 बॉलमध्ये नॉट आऊट 30 रन्स केल्या. तर विजय शंकर याने 54 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 69 धावा केल्या. तर दिल्लीकडून विपराज निगम याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल (विकेटकीपर), अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, अक्षर पटेल (कॅप्टन), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि मोहित शर्मा.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, डेव्हॉन कॉनव्हे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), आर अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद आणि मथीशा पाथिराना.