
ऋतुराज गायकवाड याच्यानंतर कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी हा देखील चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवाची मालिका खंडीत करण्यात अपयशी ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात एकतर्फी आणि धमाकेदार विजय मिळवला आहे. चेन्नईने केकेआरला विजयासाठी 104 धावांचं आव्हन दिलं होतं. केकेआरने हे आव्हान 10.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. केकेआरने 107 धावा केल्या. केकेआरने यासह या मोसमातील एकूण तिसरा विजय मिळवला. तर चेन्नईचा हा घरच्या मैदानातील सलग तिसरा तर एकूण सलग पाचवा पराभव ठरला.
केकेआरसाठी सुनील नारायण याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सुनीलने 18 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 2 फोरसह 44 रन्स केल्या. क्विंटन डी कॉक 23 धावा करुन माघारी परतला. तर त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रिंकु सिंह या जोडीने फटकेबाजी करत केकेआरला झटपट विजय मिळवून दिला. रहाणेने 17 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 20 रन्स केल्या. तर रिंकु सिंह 15 धावांवर नाबाद परतला. केकेआरने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली. केकेआर आता तिसऱ्या स्थानी विराजमान झाली आहे.
दरम्यान त्याआधी केकेआरने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केकेआरच्या गोलंदाजांनी कॅप्टन रहाणेचा हा निर्णय योग्य ठरवला आणि चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 9 झटके देत 103 धावांवर रोखलं. चेन्नईसाठी शिवम दुबे याने सर्वाधिक नाबाद 31 धावा केल्या. तर विजय शंकरने 29 धावा केल्या. तर इतर फलंदाजांनी केकेआरच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. केकेआरसाठी सुनील नरीन याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोईन अली आणि वैभव अरोरा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, डेव्हॉन कॉनव्हे, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, शिवम दुबे, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, नूर अहमद, अंशुल कंबोज आणि खलील अहमद.