DC vs RCB : कृणाल पंड्याची मॅचविनिंग खेळी, आरसीबीचा ‘विराट’ विजय, दिल्लीवर 6 विकेट्सने मात, हिशोब क्लिअर

Delhi Capitals vs Royal Challengers Bengaluru Match Result : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने होम टीम दिल्ली कॅपिट्ल्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत 24 मार्चच्या पराभवाची अचूक परतफेड केली आणि पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेपही घेतली आहे.

DC vs RCB : कृणाल पंड्याची मॅचविनिंग खेळी, आरसीबीचा विराट विजय, दिल्लीवर 6 विकेट्सने मात, हिशोब क्लिअर
Krunal Pandya and Virat Kohli DC vs RCB Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 27, 2025 | 11:53 PM

ऑलराउंडर कृणाल पंड्या आणि विराट कोहली या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्सचा त्यांच्याच घरच्या मैदानात 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. दिल्लीने आरसीबीला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 4 विकेट्स गमावून आणि 9 बॉलआधी पूर्ण केलं. आरसीबीने 18.3 ओव्हरमध्ये 165 धावा केल्या. आरसीबीने यासह दिल्लीचा हिशोबही क्लिअर केला आणि पराभवाची परतफेड केली. दिल्लीने आरसीबीला 24 मार्च रोजी 6 विकेट्सने पराभूत केलं होतं. आता आरसीबीने दिल्लीला जशास तसं उत्तर दिलं. आरसीबीचा हा या मोसमातील एकूण सातवा विजय ठरला. तर दिल्लीचा हा तिसरा पराभव ठरला.

कृणाल पंड्या मॅचविनर

कृणाल पंड्या आणि विराट कोहली या दोघांनी आरसीबीच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. कृणाल याने अखेरपर्यंत नाबाद राहून आरसीबीला विजयी केलं. कृणालने 47 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 73 धावा केल्या. कृणालसह टीम डेव्हिड 19 धावांवर नाबाद परतला. विराट कोहली याने या हंगामात अर्धशतकांची हॅटट्रिक केली. विराटने 47 बॉलमध्ये 4 फोरसह 51 रन्स केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतरांना काही खास करता आलं नाही. ओपनर जेकब बेथेल याने 6 बॉलमध्ये 12 रन्स केल्या. देवदत्त पडीक्कल याने घोर निराशा केली. देवदत्त याला भोपळाही फोडता आला नाही. तर कर्णधार रजत पाटीदार याने 6 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. मात्र त्यानंतर कृणाल याने केलेल्या खेळीमुळे आरसीबाला कोणत्याही अडचणीशिवाय विजय मिळवता आला. दिल्लीकडून कर्णधार अक्षर पटेल याने 2 विकेट्स घेतल्या. तर दुष्मंथा चमीरा याने 1 विकेट घेतली.

पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी आरसीबीने टॉस जिंकला. कर्णधार रजत पाटीदार याने दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. दिल्लीच्या बहुतांश फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांनी त्यांना मोठी खेळी करण्यापासून रोखलं. दिल्लीसाठी केएल राहुल याने 41, ट्रिस्टन स्टब्स याने 34, अभिषेक पोरेल 28 आणि फाफ डु प्लेसीसने 22 धावांचं योगदान दिलं. या चौघांव्यतिरिक्त एकालाही 20 पार मजल मारता आली नाही. आरसीबीसाठी भुवनेश्वर कुमार याने 3 विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड याने दोघांना आऊट केलं. तर यश दयाल आणि कृणाल पंड्या या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

आरसीबीचा सातवा विजय

आरसीबी एक नंबर

दरम्यान आरसीबीने या सातव्या विजयासह आणखी एक धमाका केला आहे. आरसीबीने गुजरात टायटन्सला मागे टाकत 14  गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे आरसीबीला आता प्लेऑफचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी फक्त एकाच विजयाची गरज आहे.