IPL 2025, CSK vs KKR : धोनीने कर्णधारपद स्वीकारताच पहिल्याच सामन्यात मनासारखा निर्णय, म्हणाला की…

आयपीएल 2025 स्पर्धेत 25वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यापासून चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर असणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल होताच महेंद्रसिंह धोनीने मन की बात सांगितली.

IPL 2025, CSK vs KKR : धोनीने कर्णधारपद स्वीकारताच पहिल्याच सामन्यात मनासारखा निर्णय, म्हणाला की...
| Updated on: Apr 11, 2025 | 7:18 PM

आयपीएल स्पर्धेतील 25 व्या सामन्यात उत्सुकता काही तासांपासून वाढली होती. त्याचं कारणंही तसंच आहे. कारण महेंद्रसिंह धोनी पु्न्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाडची दुखापत लवकर बरी होणारी नाही. त्यामुळे या स्पर्धेला आता तो मुकला असून यापुढे कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर असणार आहे. महेंद्रसिंह धोनी आयपीएल इतिहासातील सर्वात वयस्कर अनकॅप्ड कर्णधार ठरला आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल होताच महेंद्रसिंह धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. नाणेफेक कोलकाता नाईट रायडर्सने जिंकली, पण निर्णय मात्र महेंद्रसिंह धोनीच्या मनासारखा झाला. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तर धोनीने प्रथम फलंदाजीच करायची होती असं सांगितलं.

अजिंक्य रहाणेने नाणेफेकीनंतर सांगितलं की, आम्ही प्रथम गोलंदाजी करू. गेल्या सामन्यातून बरेच सकारात्मक पैलू होते. एक संघ म्हणून आपण खरोखर चांगले खेळलो. प्रत्येक सामन्यात सुधारणा करण्याबद्दल आहे. ही चांगली खेळपट्टी दिसतेय, फारसा बदल होणार नाही. आम्ही खोलवर फलंदाजी करत आहोत, म्हणूनच आपण प्रथम गोलंदाजी करण्याचा आणि गोष्टींचा पाठलाग करण्याचा विचार केला आहे. संघात एक बदल असून स्पेन्सरऐवजी मोईन अलीचा समावेश केला आहे.

महेंद्रसिंह धोनीने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. बऱ्याच वेळा आम्ही धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला असे जाणवले की विकेट थोडीशी मंदावते. जर तुम्हाला चांगली सुरुवात मिळाली नाही तर मधल्या फळीवर दबाव येतो. ऋतुराजच्या कोपरावर काहीतरी फ्रॅक्चर झाले आहे, त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता प्रत्येक सामना महत्वाचा आहे. आपण बरेच सामने गमावले आहेत आणि आता मूलभूत गोष्टी योग्यरित्या करणे महत्वाचे आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, अंशुल कंबोज, खलील अहमद