
लखनौ सुपर जायंट्सने मेगा लिलावानंतर नव्याने टीम बांधली आहे. मात्र या फ्रेंचायझीला पहिल्या तीन सामन्यात हवा तसा रिझल्ट मिळालेला नाही. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केलं. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून कमबॅक केलं. पण घरच्या मैदानावर खेळलेल्या सामन्यात पंजाब किंग्सकडून दारूण पराभव झाला. पंजाब किंग्सने 22 चेंडू आणि 8 विकेट राखून लखनौने विजयासाठी दिलेल्या 177 धावा केल्या. या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर झहीर संतापलेला दिसला. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात संघाला होम ग्राउंडचा हवा तसा फायदा मिळाला नाही, असा आरोप झहीर खानने केला. सामन्यानंतर झहीर खानने सांगितलं की, लखनौ सुपर जायंट्सने होमग्राउंडवर जशी खेळपट्टीची अपेक्षा केली होती तशी खेळपट्टी मिळाली नाही.
लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक झहीर खानने सांगितलं की, ‘मी थोडा निराश झालो आहे कारण तो घरचा सामना होता आणि आयपीएलमध्ये तुम्ही पाहिले आहे की संघांना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळतो. त्या अर्थाने मला वाटतं की क्युरेटरला तो घरचा सामना वाटला नव्हता. जणू काही पंजाबचा क्युरेटर इथेच आहे असे वाटत होते. ही अशी गोष्ट आहे ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.’ दुसरीकडे, झहीर खानने ऋषभ पंतची पाठराखण केली आहे. इतकंच काय तर पुढच्या सामन्यात कमबॅक करेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
झहीर खानने पुढे सांगितलं की, ‘माझ्यासाठी हा एक नवीन संघ आहे, पण आशा आहे की भविष्यात कोणत्याही सामन्यात असे होणार नाही. कारण यामुळे तुमचे चाहतेही निराश होतात. चाहते घरच्या मैदानावरील पहिला सामना जिंकतील या आशेने येथे आले होते. हा हंगामातील तिसरा सामना आहे आणि आम्ही अनेकदा या हंगामात संघ कसा आहे याबद्दल बोललो आहोत. आम्ही निकालांवर नाही तर प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहोत. आपल्याला काही पैलूंवर काम करावे लागेल.’