
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 63 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 59 धावांनी विजय मिळवला आहे. मुंबईने दिल्लीला विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांसमोर दिल्लीला 18.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 121 धावाच करता आल्या. मुंबईने अशाप्रकारे या मोसमतील आठवा विजय मिळवला. मुंबईने या विजयासह प्लेऑफमध्ये धडक दिली. मुंबई प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. तर दिल्लीचं या पराभवासह प्लेऑफचं स्वप्न अधुर राहिलं. सूर्यकुमार यादव, नमन धीर, मिचेल सँटनर आणि जसप्रीत बुमराह हे चौघे मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले
दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीने चिवट बॉलिंग करत मुंबईला बांधून ठेवलं. मात्र सूर्यकुमार यादव आणि नमन धीर या जोडीने शेवटच्या 12 बॉलमध्ये गेम फिरवला. नमन धीर आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी 19 आणि 20 व्या ओव्हरमध्ये एकूण 48 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 180 धावांपर्यंत पोहचता आलं. सूर्याने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. सूर्याने नॉट आऊट 73 रन्स केल्या. तर नमन याची 8 चेंडूत नाबाद 24 धावांची खेळी निर्णायक ठरली.
त्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करायला आलेल्या दिल्लीला मुंबईच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने झटके दिले आणि सामन्यावर शेवटपर्यंत पकड कायम ठेवली. दिल्लीचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज मुंबईच्या माऱ्यासमोर ढेर झाले. केएल राहुल 11 रन्स करुन आऊट झाला. तर कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि अभिषेक पोरेल या दोघांनी प्रत्येकी 6-6 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. टॉप ऑर्डर ढेर झाल्याचा दबाव मधल्या फळीतील फलंदाजांवर आला. समीर रिझवी आणि विपराज निगम या दोघांनी काही मोठे फटके मारुन दिल्लीला कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी या दोघांचाही करेक्ट कार्यक्रम केला.
पलटण प्लेऑफमध्ये, दिल्लीचा पत्ता कट
The quest for Title No. 6⃣ is alive 🏆
Congratulations to @mipaltan who become the fourth and final team into the #TATAIPL 2025 playoffs 💙 👏#MIvDC pic.twitter.com/gAbUhbJ8Ep
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2025
समीर रिझवी याने 39 तर विपराज निगम याने 20 धावा जोडल्या. तर आशुतोष शर्मा याने 18 धावांचं योगदान दिलं. तर मुंबईच्या गोलंदाजांनी त्या व्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकड्यापर्यंत पोहचू दिलं नाही. मुंबईने अशाप्रकारे सहज आणि एकतर्फी विजय मिळवला. मुंबईसाठी जसप्रीत बुमराह आणि मिचेल सँटनर या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, विल जॅक्स आणि कर्ण शर्मा या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.