MI vs GT Toss : गुजरातने टॉस जिंकला, वानखेडेत पलटणची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल

Mumbai Indians vs Gujarat Titans Toss : मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या 18 व्या मोसमातील वानखेडे स्टेडियममधील हा सहावा सामना आहे. मुंबई या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध 2 हात करणार आहे.

MI vs GT Toss : गुजरातने टॉस जिंकला, वानखेडेत पलटणची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल
Hardik Pandya and Shubman Gill MI vs GT Toss
Image Credit source: Social Media
| Updated on: May 06, 2025 | 7:29 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 56 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. शुबमन गिल गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. गुजरात टायटन्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार शुबमन गिल याने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे पलटण घरच्या मैदानात पाहुण्या गुजरातसमोर किती धावा करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल

मुंबई इंडियन्सने गुजरात विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन हार्दिक पंड्या याने आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केलाय. ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी अर्शद खान याला संधी देण्यात आली आहे.

मुंबई गुजरातचा हिशोब बरोबर करणार?

मुंबईचा हा या मोसमातील 12 वा तर गुजरातचा 11 वा सामना आहे. मुंबईने एकूण 7 तर सलग 6 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला गुजरातने 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर गुजरातला 3 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. गुजरात आणि मुंबईची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 29 मार्चला गुजरातने मुंबईवर 36 धावांनी मात केली होती. त्यामुळे मुंबईचा आता या पराभवाचा हिशोब बरोबर करत सलग सातवा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.

गुजरात मुंबईवर वरचढ

दरम्यान मुंबई विरुद्ध गुजरात यांच्यात आतापर्यंत एकूण 6 सामने खेळवण्यात आले आहेत. गुजरातने या 6 पैकी सर्वाधिक 4 सामन्यांमध्ये मुंबईवर मात केली आहे. तर पलटणला 2 सामन्यांमध्ये विजयी होता आलं आहे.

गुजरातने टॉस जिंकला

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, आर साई किशोर, अर्शद खान, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.