PBKS vs DC : दिल्ली कॅपिट्ल्सने शेवटच्या सामन्यात टॉस जिंकला, पंजाब किती धावा करणार?
Punjab Kings vs Delhi Capitals Toss : दिल्ली कॅपिट्ल्ससमोर आयपीएलच्या 18 व्या मोसमातील शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्सचं आव्हान आहे. दिल्ली या सामन्यात चेजिंग करणार आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 66 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. जयपूरमध्ये खेळवण्यात येत असलेला हा या मोसमातील सहावा सामना आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस जिंकला. अक्षर पटेल याला आजारामुळे शेवटच्या सामन्यालाही मुकावं लागलं आहे. त्यामुळे हंगामी कर्णधार फाफ डु प्लेसीस याने फिल्डिंगचा निर्णय करत पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील 8 मे रोजीचा सामना रद्द करण्यात आला होता.त्यामुळे हा सामना आता नव्याने खेळवण्यात येणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील स्थिती तणावाची झाली होती. तसेच 8 मे रोजी एचपीसीए क्रिकेट स्टेडियम, धरमशाळा येथे या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा स्टेडियम सीमेपासून काही किमी अंतरावर असल्याने सुरक्षेच्या कारणामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता.
दिल्ली कॅपिट्ल्सचा गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभव झाला. दिल्ली या पराभवासह प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. आता दिल्लीचा पंजाब विरुद्धचा हा साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. त्यामुळे दिल्लीचा या हंगामातील शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न आहे. तर पंजाबकडे हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहचण्याची संधी आहे. अशात आता दिल्ली जाता जाता पंजाबचा गेम बिघडवणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दोन्ही संघांची स्थिती
पंजाबचा हा या मोसमातील 13 वा सामना आहे. पंजाबने याआधी 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर पंजाबचा एक सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. अशात पंजाब 17 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. पंजाबचा नेट रनरेट हा +0.389 असा आहे. तर दिल्लीने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर तितकेच सामने गमावले आहेत. तर दिल्लीचाही एक सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दिल्लीच्या खात्यात 13 पॉइंट्स आहेत. दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे.
दिल्लीने या हंगामात अप्रतिम सुरुवात केली होती. दिल्लीने पहिले सलग 4 सामने जिंकून प्लेऑफचा दावा ठोकला होता. मात्र निर्णायक क्षणी दिल्लीने सामने गमावले. त्यामुळे दिल्लीसाठी करो या मरो स्थिती उद्भवली. दिल्ली अशा परिस्थितीत अपयशी ठरल्याने त्यांचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्ठात आलं.
पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन: प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कॅप्टन), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, अजमतुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार आणि अर्शदीप सिंग.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), सेदिकुल्ला अटल, करुण नायर, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, विपराज निगम, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुस्तफिजुर रहमान आणि मुकेश कुमार.