
पंजाब किंग्सने आयपीएल 2025 स्पर्धेच्या 31 व्या सामन्यात कमाल केली. कोणालाही वाटलं नव्हतं की 111 धावा डिफेंड केल्या जातील. मात्र स्वप्न सत्यात उतरलं आणि पंजाब किंग्सने सामना 16 धावांनी जिंकला. पण कोलकाता नाईट रायडर्स फलंदाजी करत असताना 47व्या चेंडूवर एक विचित्र प्रकार घडला. म्हणजेच आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर नको ते घडलं. हे षटक युझवेंद्र चहल टाकत होता. या चेंडूवर जे काही घडलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अजिंक्य राहणेची विकेट पडल्यानंतर दोन चेंडूनंतर असं घडलं. कोलकाता नाईट रायडर्सन 62 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. वेंकटेश अय्यर स्ट्राईकवर होता. त्याने चहलच्या पाचव्या चेंडूवर लाँग लेगच्या दिशेने स्वीप केलं. चौकार अडवण्यासाठी पंजाब किंग्सच्या बार्टलेटने धावा घेतली आणि चेंडू पकडलाही. पण त्यानंतर बार्टलेटकडून नको ती चूक झाली.
झेव्हियर बार्टलेटने चेंडू अडवल्यानंतर विकेटकीपरच्या दिशेने फेकण्यासाठी तयारी केली. पण झालं असं की चेंडू विकेटकीपरकडे जाण्याऐवजी मागे गेला. गेला तर गेला बाउंड्री पार गेला. खरं तर वेंकटेश अय्यरला एक धाव मिळायला हवी होती. पण त्याला अतिरिक्त 4 धावांचा फायदा झाला. म्हणजेच बार्टलेटच्या चुकीमुळे एकाच चेंडूवर पाच धावा मिळाल्या. कोलकाता नाईट रायडर्सच्या आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बार्टलेटकडून झालेल्या चुकीमुळे वेंकटेश अय्यरचं खातं खुललं. पहिल्याच चेंडूवर पाच धावा मिळाल्या. अतिरिक्त धाव देण्यामागील कारण म्हणजे बार्टलेटची कृती गचाल क्षेत्ररक्षणाऐवजी ओव्हरथ्रो मानली गेली. त्यामुळे, फलंदाजांनी धावलेली एक धाव आणि चौकार मोजून पाच धावा दिल्या गेल्या.
वेंकटेश अय्यर संघाचा जास्त काही फायदा करू शकला नाही. दोन षटकानंतर फक्त 4 चेंडूचा सामना केला आणि 7 धावा करून बाद झाला. दुसरीकडे, बार्टलेटने या सामन्यात 15 चेंडूत 11 धावांची खेळी केली. तसेच 3 षटकात 30 धावा देत 1 गडी बाद केला. दरम्यान आयपीएल इतिहासात सर्वात कमी स्कोअर करूनही त्या डिफेंड करण्याची किमया श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात पंजाब किंग्सने केली आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने 116 धावा डिफेंड केल्या होत्या. तेव्हा पंजाब किंग्स हाच संघ समोर होता.