पंजाब किंग्सने पहिला सामना जिंकल्यानंतर सहमालकीन प्रीति झिंटाने केली पोस्ट, श्रेयसच्या 97 धावा म्हणजे…

आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सने विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सची गाडी विजयाच्या रुळावरून धावणार आहे. असं असताना पंजाब किंग्स फ्रेंचायझीची सहमालकीन प्रीति झिंटाने एक पोस्ट केली आहे. यात तिने श्रेयस अय्यरच्या शतकाबाबत भाष्य केलं आहे.

पंजाब किंग्सने पहिला सामना जिंकल्यानंतर सहमालकीन प्रीति झिंटाने केली पोस्ट, श्रेयसच्या 97 धावा म्हणजे...
Image Credit source: PBKS And Priety Zintat Twitter
| Updated on: Mar 26, 2025 | 5:35 PM

आयपीएल स्पर्धेच्या मागचा इतिहास पाहिला तर पंजाब किंग्स हा संघ कायम दुबळा गणला गेला आहे. कारण एकदाच अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न काय ते पूर्ण झालं आहे. प्लेऑफमध्येही एकदाच स्थान मिळालं आहे. यावरून मागच्या 17 पर्वात पंजाब किंग्सची कामगिरी कशी असेल हे अधोरेखित होतं. पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. नाणेफेकीचा कौलही गुजरातच्या बाजूने लागला आणि मनासारखा निर्णय घेता आला. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर यानेही प्रथम गोलंदाजी केली असती असं म्हंटलं होतं. त्यामुळे मोठी धावसंख्या उभं करण्याचं आव्हान होतं. पंजाब किंग्सने त्या पद्धतीने सुरुवात केली. कर्णधार श्रेयस अय्यर याने नाबाद 97 धावांची खेळी केली. त्याचं शतक फक्त तीन धावांनी हुकलं. खरं तर सहा चेंडूत शिल्लक असताना त्याला स्ट्राईक मिळाली नाही. या उलट त्यानेच शशांकला आक्रमकपणे खेळण्याचा सल्ला दिला. यानंतर पंजाब किंग्सची सहमालकिन प्रीति झिंटाने एक पोस्ट केली आहे.

प्रीति झिंटाने पोस्टमध्ये लिहिलं की, ‘ स्पर्धेची सुरुवात चांगली झाली, 97 धावांच्या काही खेळी शतकापेक्षा नेहमीच चांगल्या असतात. श्रेयस अय्यरला सलाम, ज्याने उत्तम क्लास, नेतृत्व आणि आक्रमकता दाखवली. पण मला सर्वात जास्त आवडले ते म्हणजे टीम एक संघ म्हणून खेळली. विजयकुमार वैशाख, प्रियांश आर्य, मार्को यानसेन, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग यांचे खूप खूप अभिनंदन!’

पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरच्या 97 आणि शशांक सिंहच्या 44 धावांच्या जोरावर 243 धावा केल्या. पंजाब किंग्सचा आयपीएल स्पर्धेतील हा दुसरा मोठा स्कोअर होता. गुजरात टायटन्सने या लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. साई सुदर्शन 74 आणि जोस बटलरने 54 धावांची खेळी केली. पण विजयासाठी 11 धावा तोकड्या पडल्या आणि पंजाबने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. विजयकुमार वैशाखने तीन षटकात 28 धावा दिल्या. तर अर्शदीप सिंगने चार षटकात 36 धावा देत दोन गडी बाद केले.