
आयपीएल 2025 स्पर्धेत दहा संघांची जेतेपदासाठी चुरशीची लढाई गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणातलिकेत उलथापालथ होत आहे. तसेच कधी हा संघ टॉपला, तर कधी तो संघ..अशी स्थिती दिसून येत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून चेन्नई सुपर किंग्स हा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. या संघाच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या आहेत. पण उर्वरित सामन्यात एखाद्या संघाचं प्लेऑफचं स्वप्न भंग करू शकतात. दुसरीकडे, सद्यस्थितीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा संघ गुणतालिकेत टॉपला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 10 पैकी 7 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. सध्या 14 गुण आणि +0.521 नेट रनरेटसह टॉपला आहे. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो अशी स्थिती आहे. आता आरसीबीला फक्त 4 सामने खेळायचे असून त्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. पण जर तसं झालं नाही तर स्पर्धेतून आऊटही होऊ शकतो. चला जाणून घेऊयात जर तरचं गणित…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे आता स्पर्धेतील चार सामने शिल्लक आहेत. चेन्नई सुपर किंग्ससोबत 3 मे रोजी, लखनौ सुपर जायंट्ससोबत 9 मे, सनरायझर्स हैदराबादसोबत 13 मे आणि कोलकाता नाईट रायडर्ससोबत 17 मे रोजी सामने होणार आहे. यापैकी एका संघाला पराभूत केलं तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल. पण चारही सामने गमावले तर गणित जर तर वर येऊन ठेपेल. इतकंच काय स्पर्धेतून आऊटही होऊ शकतो. कारण पुढच्या काही सामन्यात गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपटिल्स यांचे 14 गुण होऊ शकतात. तसेच या संघांना 16 गुण करणं काही कठीण नाही. इतकंच काय तर पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादला ही तितकीच संधी आहे.
प्लेऑफच्या शर्यतीत गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आहेत. त्यामुळे आठ संघ चार स्थानासाठी लढणार आहेत. तर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सचं यांचं गणित जर तरवर आहे. म्हणजे इतर संघांवर अवलंबून असल्याने आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पुढे चार पैकी एका सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. जर तसं झालं नाही तर इतर संघांना टॉप 4 मध्ये संधी मिळेल.