RR vs MI : रोहित-रायनच्या अर्धशतकानंतर हार्दिक-सूर्याची चाबूक बॅटिंग, राजस्थानसमोर 218 धावांचं आव्हान

Rajasthan Royals vs Mumbai Indians 1st Innings Highlights : मुंबई इंडियन्सच्या पहिल्या 4 फलंदाजांनी 40 पेक्षा अधिक धावा केल्या. त्यामुळे मुंबईला सहज 200 पार मजल मारता आली.

RR vs MI : रोहित-रायनच्या अर्धशतकानंतर हार्दिक-सूर्याची चाबूक बॅटिंग, राजस्थानसमोर 218 धावांचं आव्हान
Suryakumar Yadav and Hardik Pandya Mumbai Indians Ipl 2025
Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 01, 2025 | 9:51 PM

मुंबई इंडियन्सच्या पहिल्या 4 फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सची जोरदार धुलाई करत आयपीएल 2025 मधील 50 व्या सामन्यात 200 पार मजल मारली आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये फक्त 2 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 90 पेक्षा अधिक धावांची नाबाद भागीदारी केली. या दरम्यान हार्दिक आणि सूर्यकुमार या दोघांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे आता राजस्थानला विजयासाठी 218 धावांचं आव्हान मिळालं आहे. आता मुंबईच्या फलंदाजांनंतर गोलंदाजांच्या कामगिरीकडे पलटणच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबईची तोडफोड बॅटिंग

राजस्थानने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने तोडफोड बॅटिंग करत वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. तसेच या दोघांनी पलटणसाठी सलामी शतकी भागीदारीही केली. रोहित आणि रायन मुंबईसाठी शतकी सलामी करणारी तिसरी जोडी ठरली. राजस्थानसाठी ही जोडी डोकेदुखी ठरत असताना महीश तीक्षणा याने पहिली विकेट मिळवून दिली.

महीशने रायनला बोल्ड केलं. रायने 38 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 फोरसह 160.53 च्या स्ट्राईक रेटने 61 रन्स केल्या. रायनंतर रोहित शर्माही आऊट झाला. रोहितने 36 चेंडूत 9 चौकारांसह 53 धावांची खेळी केली.

सूर्या-हार्दिकची चाबूक बॅटिंग

रोहित आणि रायन सलामी जोडी आऊट झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली. सूर्या आणि हार्दिक या जोडीने तिसर्‍या विकेटसाठी 94 धावांची नाबाद भागीदारी केली. हार्दिक आणि सूर्या या दोघांनी प्रत्येकी 48 धावा केल्या. हार्दिकने 1 सिक्स आणि 6 फोरसह या धावा केल्या. तर सूर्याच्या खेळीत 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. तर राजस्थानकडून महीश व्यतिरिक्त कर्णधार रियान पराग यानेही 1 विकेट घेतली.

मुंबईच्या फलंदाजांची फटकेबाजी

मुंबई विजयी षटकार लगावणार?

दरम्यान राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने गुजरात टायटन्स विरुद्ध एकहाती विजय मिळवून दिला होता. त्यामुळे राजस्थान पु्न्हा एकदा मुंबई विरुद्ध तसाच विजय मिळवणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबई सलग सहाव्या विजयासाठी उत्सूक आहे. आता या दोघांपैकी कोण यशस्वी ठरणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.