SRH vs PBKS : हैदराबादसमोर पराभवाची मालिका खंडीत करण्याचं आव्हान, पंजाबविरुद्ध विजयी ट्रॅकवर परतणार?

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Preview : सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या 18 व्या मोसमात अप्रतिम सुरुवात केली. मात्र त्यानंतर हैदराबादने सलग 4 सामने गमावले.

SRH vs PBKS : हैदराबादसमोर पराभवाची मालिका खंडीत करण्याचं आव्हान,  पंजाबविरुद्ध विजयी ट्रॅकवर परतणार?
Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Preview
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 12, 2025 | 5:06 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात आज 12 एप्रिलला डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात लढत आहे. तर दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला दणक्यात सुरुवात केल्यानंतर हैदराबाद विजयाच्या ट्रॅकवरुन घसरली आहे. हैदराबादने विजयी सुरुवातीनंतर सलग 4 सामने गमावले आहेत. त्यामुळे 300 पार पोहचण्याच्या बाता मारणाऱ्या हैदराबादसमोर पंजाबविरुद्धच्या सामन्यातून कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे.

हैदराबाद सपशेल अपयशी

पंजाबचा हा पाचवा तर हैदराबादचा सहावा सामना असणार आहे. हैदराबादने सलामीच्या सामन्यात राजस्थानचा 44 धावांनी धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. हैदराबादच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी राक्षसी खेळी करत दहशत तयार केली. हैदराबादने राजस्थानसमोर 286 धावा केल्या. आम्ही पुढील सामन्यांत 300 पार पोहचू, असा विश्वास हैदराबादच्या खेळाडूंनी व्यक्त केला. मात्र त्यानंतर हैदराबादचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. हैदराबादने सलग 4 सामने गमावले. त्यामुळे हैदराबादसमोर पंजाबविरुद्ध कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये ताज्या आकडेवारीनुसार, शेवटून पहिल्या अर्थात दहाव्या स्थानी आहे.

पंजाबची कडक सुरुवात

तर दुसऱ्या बाजूला पंजाबने नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात अप्रतिम सुरुवात केली. श्रेयस अय्यर याने पंजाबला सलग 2 सामने जिंकून दिले. मात्र पंजाब विजयी हॅट्रिक करण्यात अपयशी ठरली. पंजाबने गुजरात आणि लखनौला पराभूत केलं. मात्र त्यानंतर राजस्थानने 50 धावांनी विजय मिळवत पंजाबला सलग तिसऱ्या विजयापासून रोखलं. मात्र पंजाबने पुन्हा कमबॅक केलं. पंजाबने चेन्नईला पराभूत केलं आणि एकूण तिसरा विजय मिळवला. पंजाब 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान उभयसंघात आतापर्यंत एकूण 23 सामने खेळवण्यात आले आहेत. आकडेवारी पाहता हैदराबाद पंजाबवर वरचढ राहिली आहे. हैदराबादने पंजाबवर 16 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर पंजाब 7 सामन्यात यशस्वी ठरली आहे.

सनरायझर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिनव मनोहर, सचिन बेबी, हर्षल पटेल, ॲडम झम्पा, मोहम्मद शमी, राहुल चहर, जयदेव उनाडकट, कमिंदू मेंडिस, झीशान अन्सारी, वियान मुल्डर, अथर्व तायडे, सिमरन सिंह, एशान मलिंगा आणि अनिकेत वर्मा.

पंजाब किंग्स टीम: जोश इंग्लिस (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, अजमतुल्ला ओमरझाई, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे, हरनूर सिंग, मुशीर खान आणि पायला अविनाश.