Abhishek Sharma Wicket: अभिषेक शर्मा बाद की नाबाद? पंचांच्या निर्णयावरून वाद, झालं असं की..
आयपीएल 2026 स्पर्धेतील सहावा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात अभिषेक शर्माच्या विकेटवरून वादाला फोडणी मिळली आहे. नेमकं काय झालं आणि कशावरून वाद रंगलाय ते जाणून घेऊयात

Abhishek Sharma IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात फेल गेल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला सूर गवसला. पण या सामन्यातही त्याचं नशीब फुटकं निघालं. कारण त्याचं अर्धशतक अवघं 2 धावांनी हुकलं. त्याने आक्रमकपणे 48 धावांची खेळी केली होती. यात 4 षटकार आणि 4 चौकार मारले होते. पण ब्लेसिंग मुझरबानीच्या गोलंदाजीवर फटका मारताना झेल बाद झाला. त्यामुळे या स्पर्धेतील पहिल्या अर्धशतक ठोकण्याचं स्वप्न भंगलं. पण अभिषेक शर्मा झेलबाद होता की नाही यावरून वादाला फोडणी मिळाली आहे. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने संघाचं नववं षटक मुझरबानी याच्याकडे सोपवलं. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अभिषेक शर्माने स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका मारला. पण सीमेजवळ उभ्या असलेल्या वरूण चक्रवर्तीने त्याचा झेल पकडला. पण जेव्हा या झेलचा रिप्ले पाहिला गेला तेव्हा हा झेल वादाच्या भोवऱ्यात अडकला.
अभिषेक शर्मा बाद की नाबाद?
कोलकात्याचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीच्या एका आखूड चेंडूवर अभिषेकने पुल शॉट मारला.अभिषेक शर्माचा झेल जेव्हा वरूण चक्रवर्तीने पकडला तेव्हा चेंडू जमिनीवर लागला होता. म्हणजे वरूण चक्रवर्तीच्या हातात चेंडू येईपर्यंत एक टप्पा पडला होता, असं दिसलं. मैदानी पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला आणि अभिषेकला थांबायला सांगितले. तिसऱ्या पंचांनी तो झेल वेगवेगळ्या कोनांतून पाहिला. रिप्ले पाहत असताना असे वाटत होते की अभिषेकला संशयाचा फायदा मिळेल. पण तसं झालं नाही आणि त्याला बाद ठरवण्यात आले. अभिषेक शर्माला बाद दिल्याने सोशल मीडियावर वादाला फोडणी मिळाली आहे. चाहत्यांच्या मते, अभिषेक शर्मा नाबाद होता.
अशा प्रकरणात बहुतांश वेळा फलंदाजला फायदा मिळतो. पण यावेळी तसं झालं नाही. अभिषेक शर्मा 21 चेंडूत 48 धावांची खेळी करून तंबूत परतला. याच सामन्यात अभिषेक शर्माने वरूण चक्रवर्तीची जोरदार धुलाई केली होती. एकाच षटकात 25 धावा काढल्या होत्या. यात 2 षटकार आणि 3 चौकार मारले होते.