IPL 2026, LSG vs RCB: सामन्यात कृणाल पांड्यांच्या बाउंसरने पूरनचा संताप, मैदानातच रंगली शाब्दिक चकमक
आयपीएल 2026 स्पर्धेतील 50वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. हा सामना लखनौने जिंकला, पण फलंदाजीवेळी वाद पाहायला मिळाला. कृणाल पांड्याच्या बाउंसरनंतर निकोलस पूरनने त्याच्याशी शाब्दिक चकमक केली.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक संघ जीव तोडून विजयासाठी प्रयत्न करत आहे. कारण एक पराभव आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे. लखनौ सुपर जायंट्ससाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे आरसीबीविरुद्धचा सामना काहीही करून जिंकणं भाग होतं. झालंही तसंच.. लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला होता आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण लखनौने जबरदस्त फलंदाजी केली आणि 19 षटकात 209 धावा केल्या. पण पावसाच्या व्यत्ययामुळे शेवटचं षटक झालं नाही आणि डीएलएस टार्गेट 213 धावांचं दिलं गेलं. आरसीबीचा संघ 6 गडी गमवून 203 धावा करू शकला. या सामन्यात लखनौची फलंदाजी सुरू असताना एक वाद पाहायला मिळाला. आरसीबीचा कृणाल पांड्या आणि लखनौचा निकोलस पूरन यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात कृणाल पांड्याने अर्शिन कुलकर्णीला बाद केल्यानंतर निकोलस पूरन क्रीजवर आला आणि ही घटना घडली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या निकोलस पूरनचे स्वागत कृणालने एका वेगवान बाउन्सरने केले. सुमारे 119 किमी प्रतितास वेगाने हा चेंडू टाकला. पण पूरनने त्याचा कसाबसा सामना केला. पुढच्याच चेंडूवर कृणालने आणखी एक बाउन्सर टाकला, ज्यावर पूरनने एक धाव काढली. धाव पूर्ण झाल्यावर पूरन कृणालकडे बघितलं आणि काहीतरी बोलला. त्यामुळे काही सेकंद परिस्थिती तणावपूर्ण झाली. पण हा प्रसंग फार काळ टिकला नाही. दोन्ही खेळाडू लगेच सामना खेळण्यास सज्ज झाले. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Things are heating up in this Revenge Week clash! 🔥
A contest within the contest is brewing between #NicholasPooran and #KrunalPandya! 👀#TATAIPL Revenge Week 2026 ➡️ #LSGvRCB | LIVE NOW 👉 https://t.co/gEprGnf2A7 pic.twitter.com/C2oqmrYF0X
— Star Sports (@StarSportsIndia) May 7, 2026
लखनौ सुपर जायंट्सने सलग सहा पराभवानंतर विजय मिळवला आहे. या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘आमच्यासाठी हा सामना नक्कीच चांगला होता. संपूर्ण संघासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. आम्ही अनेक गोष्टी आजमावत आहोत. एकमताने खेळणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा हंगाम खडतर होता, पण कधीकधी तुम्हाला कठोर परिश्रम करावेच लागतात. फलंदाजी आणि गोलंदाजी यांचा मेळ बसेल असा एक परिपूर्ण खेळ करण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न होता. काही वेळा नशीब साथ देत होते, तर काही वेळा दुर्दैव, पण विजय मिळाल्याचा खूप आनंद आहे.’