IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार बदलला, कारण की…
आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून जितेश शर्मा नाणेफेकीसाठी आला होता. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. असं का ते जितेश शर्माने नाणेफेकीनंतर स्पष्ट केलं.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 61व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफचं तिकीट देणार आहे. असं असताना या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कर्णधार बदलला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. साखळी फेरीचे शेवटचे सामने होत असताना हा बदल आश्चर्यकारक वाटत आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. नाणेफेकीचा कौल होणार होता तेव्हा रजत पाटिदार ऐवजी जितेश शर्मा मैदानात आला होता. त्यामुळे या सामन्यात रजत पाटिदार खेळणार नाही हे निश्चित झालं. पण रजत पाटिदार का खेळत नाही याचीही चर्चा रंगली. रजत पाटिदारला नेमकं काय झालं याबाबत उलटसुलट चर्चा रंगण्यास सुरूवात झाली. पण कर्णधार जितेश शर्माने याबाबत स्पष्टीकरण दिलं आणि चर्चांना पूर्णविराम लागला.
नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर जितेश शर्मा काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. कर्णधार जितेश शर्माने सांगितलं की, ‘आम्हाला प्रथम गोलंदाजी करायला आवडले असते, पण खेळपट्टी चांगली आहे आणि 40 षटकांपर्यंत ती चांगली खेळेल. रजत उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि तो आपल्याला हैदराबादमध्ये खेळताना दिसेल. आपण स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात आहोत आणि संघ वैयक्तिकरित्या तसेच एक संघ म्हणून जशी कामगिरी करत आहे, त्यामुळे मी आनंदी आहे. होय, संघ सध्या इतका स्थिर दिसत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही प्रत्येक विभागात आमचे सर्वोत्तम योगदान देत आहोत.’
जितेश शर्मा पुढे म्हणाला की, ‘आज रात्रीचा एक विजय प्लेऑफमधील आमचे स्थान निश्चित करेल, त्यामुळे हा आमच्यासाठी एक मोठा सामना आहे. या टप्प्यावर प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. हा विजय केवळ आमच्यासाठीच नाही, तर इतर अनेक संघांसाठीही संपूर्ण गुणतालिका बदलू शकतो. सुयश रजतच्या जागी आणि रोमॅरिओ डफीच्या जागी खेळतील.’
सूत्रांनुसार, पाटिदार संघासोबत धर्मशाळा येथे गेला नाही आणि आरसीबी-पीबीकेएस सामन्यापूर्वीच्या दोन्ही सराव सत्रांनाही तो गैरहजर होता.जितेशने नाणेफेकीदरम्यान स्पष्ट केलं की आरसीबीचा कर्णधार चांगला बरा होत आहे आणि संघाच्या पुढील सामन्यासाठी परत येऊ शकतो. आरसीबीचा साखळी फेरीतील शेवटचा सामना 22 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होईल.