
वैभव सूर्यवंशी याने आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू हा बहुमान मिळवला. आयपीएलच्या 18 व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने त्याला ही मोठी संधी दिली. वैभवने या संधींचं सोनं करत आपला ठसा उमटवला. वैभवने त्याच्या पहिल्याच मोसमात शतक झळकावलं. वैभव या स्पर्धेत सर्वात वेगवान शतक करणारा पहिला युवा भारतीय ठरला. त्यानंतर वैभवचा तडाखा कायमच आहे. वैभवने अंडर 19 टीम इंडिया आणि विविध वयोगटातील स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी वैभवने अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्या बॉलिंगवर जोरदार धुलाई केली आहे.
वैभवने आयपीएलच्या येत्या 19 व्या मोसमात काय करणार आहे याचा ट्रेलर दाखवला आहे. या मोसमाला 28 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सर्व 10 संघ तयारीला लागले आहेत. राजस्थान रॉयल्सही यात मागे नाही. राजस्थानने टीमने सोशल मीडियावर वैभव आणि रवींद्र जडेजा या दोघांचा एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.
व्हायरल व्हीडिओत वैभव सूर्यवंशी रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे. राजस्थान टीमचा ओपन नेट्समध्ये सरावादरम्यानचा हा व्हीडिओ आहे. जडेजा वैभवला मोठे फटके मारण्याचं आव्हान देतो. वैभवनेही जडेजाच्या बॉलिंगवर बेछूट फटकेबाजी करत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचं टेन्शन वाढवलंय.
जडेजानेही वैभवला आपल्या फिरकीत अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र वैभवच्या या फटकेबाजीची एकच चर्चा पाहायला मिळत आहे. वैभवचा हा आक्रमक अंदाज पाहता 19 व्या हंगामात त्याला रोखणं प्रतिस्पर्धी संघासाठी आव्हानात्मक ठरणार हे निश्चित आहे.
वैभवने 18 व्या मोसमात एकूण 7 सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं. वैभवने या 7 सामन्यांमध्ये 36 च्या सरासरीने 252 धावा केल्या. वैभवने या दरम्यान 1 शतक आणि 1 अर्धशतकही झळकावलं. वैभवने हे एकमेव शतक अवघ्या 35 चेंडूत झळकावत क्रीडा वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं होतं.
वैभवची जोरदार फटकेबाजी
🗡️🆚🥶 pic.twitter.com/02GTC3hCcr
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 19, 2026
जडेजाला आयपीएलचा तगडा आणि दांडगा असा अनुभव आहे. जडेजाने 198 डावांमध्ये 3 हजार 360 धावा केल्या आहेत. तसेच जडेजाने बॅटिंगसह बॉलिंगनेही कमाल करत एकूण 170 विकेट्स मिळवल्या आहेत. जडेजा गेली अनेक वर्ष चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. मात्र आता तो पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्ससाठी खेळणार आहे.