RR vs GT: वैभव सूर्यवंशीचं पुन्हा शतक हुकलं, पण नोंदवला असा विक्रम
आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीचा झंझावात दिसला. या स्पर्धेत त्याचं सलग दुसरं शतक हुकलं आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध शतकी खेळी करण्याची संधी होती, पण डाव 96 धावांवर आटोपला.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण या वेळेस राजस्थान रॉयल्सला हवी तशी सुरूवात मिळाली. पावरप्लेमध्ये दोन विकेट पडल्याने राजस्थान रॉयल्सवर दबाव वाढला. पण त्याची वैभव सूर्यवंशीला जराही झळ बसली नाही. त्याने आक्रमक खेळ सुरूच ठेवला. समोर गोलंदाज येईल त्याच्या तितक्याच ताकदीने प्रहार सुरू ठेवला. वैभव सूर्यवंशीने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. खरं तर त्याचा आक्रमक बाणा पाहता त्याचं हे सर्वात संथ अर्धशतक ठरलं. पण त्यानंतर त्याने आपला मूळ रंग दाखवला आणि प्रहार करण्यास सुरूवात केली. वैभव सूर्यवंशीने पुढच्या 16 चेंडूत 46 धावा काढल्या. वैभव सूर्यवंशी 47 चेंडूत 96 धावा करून बाद झाला. त्याने 204.26 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. यात त्याने 8 चौकार आणि 7 षटकार मारले. वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर ऑरेंज कॅप कायम आहे.
वैभव सूर्यवंशी बाद तरी नोंदवला विक्रम
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा नर्वस 90चा शिकार होणारा वैभव पाचवा फलंदाज ठरला आहे. तीन वेळा त्याचं शतक हुकलं. असचं डेविड वॉर्नर, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, ऋतुराज गायकवाड यांच्यासोबत घडलं आहे. तर एका आयपीएल पर्वात वैभव सूर्यवंशी तीन वेळा नर्वस 90चा शिकार ठरला आहे. यापूर्वी ग्लेन मॅक्सवेल 2014 मध्ये तीन वेळा बाद झाला होता. तर मिचेल मार्शन 2026 मध्ये 2 वेळा बाद झाला आहे.
आयपीएल प्लेऑफ सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून सलग दोन सामन्यात अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 97, तर गुजरात टायटन्सविरुद्ध 96 धावांची खेळी केली. यापूर्वी जोस बटलरने 2022 आणि ध्रुव जुरेलने 2024 आणि 2026 मध्ये मिळून ही कामगिरी केली आहे.
आयपीएल स्पर्धेत वेगाने 1000 धावा करणारा फलंदाज म्हणूनही त्याला मान मिळाला आहे. शॉन मार्शने 21 डावात, लेंडल सिमॉन्सने 23 आणि वैभव सूर्यवंशीने ही कामगिरी 23 डावात केली आहे.
आयपीएलमध्ये कमी चेंडूत 1000 धावा करण्यााच मान मात्र वैभव सूर्यवंशीला मिळाला आहे. त्याने 440 चेंडूत 1000 धावांचा पल्ला गाठला. यापूर्वी हा विक्रम आंद्रे रसेलच्या नावावर होता. त्याने 545 चेंडूत हा पल्ला गाठला होता.