SRH vs DC: अभिषेक शर्माने शतकी खेळीसह एका झटक्यात मोडले इतके सारे विक्रम, काय ते जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आक्रमक फलंदाजी करत शतक ठोकलं आणि अनेक विक्रम मोडीत काढले.

आयपीएल 2026 स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे आणि सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माला सूर गवसला आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हैदराबादच्या वाटेला प्रथम फलंदाजी आणि त्याचा पुरेपूर फायदा स्टार फलंदाज अभिषेक शर्माने घेतला. अभिषेक शर्माने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. अभिषेक शर्माने पहिल्या षटकात 2 चेंडू खेळला आणि 3 धावा केल्या. दुसऱ्या षटकात त्याने 3 चेंडूचा सामना केला आणि पाच धावा केल्या. तिसऱ्या षटकात दोन चेंडू खेळला आणि 4 धाव केल्या. त्यानंतर चौथ्या षटकापासून अभिषेक शर्माने गिअर बदलला आणि तोडफोड सुरू केली. या षटकात त्याने 2 चौकारांसह 9 धावा केल्या. पाचव्या षटकात 3 चेंडू खेळला आणि 13 धावा काढल्या. असं करत त्याची धावांची गाडी पुढे सरकली.
अभिषेक शर्माने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर 22 चेंडूत त्याने 50 धावा ठोकल्या आणि 47 चेंडूत शतक पूर्ण केलं. अभिषेक शर्माचं या पर्वातील हे पहिलं शतक आहे. यासह त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
अभिषेक शर्माचं टी20 क्रिकेटमधील हे नववं शतक आहे . या शतकासह अभिषेक शर्मा हा क्विंटन डीकॉक, विराट कोहली, रिली रोसो, साहिजाबाद फरहान यांच्यासह संयुक्तपणे पंगतीत बसला आहे. टी20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेलच्या नावावर 22, बाबर आझमच्या नावावर 12 आणि डेविड वॉर्नरच्या नावावर 10 शतकं आहेत.
अभिषेक शर्माने 184 डावात नववं शतक ठोकलं आहे. अभिषेक शर्मा हा नववं शतक झटपट ठोकणारा तिसरा फलंदाज आहे. ख्रिस गेलने नऊ शतकांसाठी 124 डाव घेतले होते. तर साहिजाबाद फरहानने 160 डावात नऊ शतकं ठोकली होती.
अभिषेक शर्माने शतका खेळी करताना षटकारांचा पाऊस पाडला. त्याने टी20 क्रिकेट 350 षटकार मारले आहेत. अभिषेक शर्माने टी20 एका डावात 10हून अधिक षटकार मारण्याचा विक्रम 5 वेळा केला आहे. या यादीत ख्रिस गेल आघाडीवर असून त्याने ही किमया 18 वेळा केली आहे.
टी20 क्रिकेटमध्ये 130 हून अधिक धावा करण्याची ही अभिषेक शर्माची चौथी वेळ आहे. यासह त्याने एरॉन फिंच आणि ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला. या दोघांनी 3 वेळा अशी कामगिरी केली आहे.
आयपीएल स्पर्धेत सर्वोच्च धावा करण्याची अभिषेक शर्माची दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्याने 2025 च्या पर्वात 141 धावा केल्या होत्या. आता त्याने नाबाद 135 धावा केल्या आहेत. या यादीत पहिल्या स्थानावर नाबाद 175 खेळीसह ख्रिस गेल आहे. तर नाबाद 158 धावांसह ब्रँडन मॅकुल आहे. क्विंटन डीकॉकने 2022 मध्ये नाबाद 140 धावा केल्या होत्या.