Video: विराट कोहलीने गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना पहिल्यांदा डिवचलं, मग हरवलं! कोणाला चिडवलं?
आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने धडक मारली आहे. सलग दुसऱ्या पर्वात आरसीबी अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली आहे. असं असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओत विराट कोहली गुजरातच्या खेळाडूंना चिडवताना दिसत आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरूने एन्ट्री मारली आहे. क्वॉलिफायर 1 स्पर्धेत गुजरात टायटन्सला 92 धावांनी पराभूत करून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या जेतेपदावर मजबूत दावा ठोकला आहे. आता प्रतिस्पर्धी संघ कोणता असेल? याची उत्सुकता आहे. अंतिम फेरीसाठी गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद किंवा राजस्थान रॉयल्स हा संघ असू शकतो. क्वॉलिफायर 1 सामन्यापूर्वी विराट कोहलीचा एक व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता. हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण या व्हिडीओत विराट कोहली गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना चिडवताना दिसत आहे. नेमकं काय झालं आणि विराट कोहलीने गुजरात टायटन्सच्या खेळाडूंची खोड काढली हे जाणून घेऊयात
विराट कोहलीने कोणाला डिवचलं?
धर्मशाळेत हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाला आणि गुजरात टायटन्सच्या बाजून निकाल लागला. त्यामुळे आरसीबीच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. असं असताना सामना सुरू होण्यापू्र्वी गुजरात टायटन्सच्या संघाचं फोटोशूट सुरू होतं. तेव्हा विराट कोहली फलंदाजीसाठी तयार होऊन सीमारेषेवर उभा होता. त्यावेळी विराट कोहलीने गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना पाहिलं आणि हसू लागला. इतकंच काय तर काही विचित्र इशारे करून डिवचलं.
विराट कोहलीने नेमकं कोणाला डिवचलं हे मात्र अस्पष्ट आहे. पण विराट कोहलीचे काही जवळचे मित्र गुजरात टायटन्सकडून खेळत आहेत. त्यात वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, प्रशिक्षक आशिष नेहरा आणि कर्णधार शुबमन गिल यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत विराट कोहली थट्टा मस्करी करत असतो. विशेष म्हणजे विराट कोहलीचा हा व्हिडीओ अंडर 19 मध्ये संघ सहकारी असलेल्या तरूवर कोहली याने काढला आहे. हा सामना पाहण्यासाठी तो मैदानात आला होता. त्याने हा व्हिडीओ शेअर केला आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.