IPL 2024, Orange Cap : चेन्नई कोलकात्याच्या सामन्यानंतरही विराट कोहलीची कॅप शाबूत, वाचा कोण कुठे ते

आयपीएल 2024 स्पर्धेतील 22 सामने पार पडले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना पार पडला. मात्र या सामन्यातही विराट कोहलीकडून कोणीही कॅप हिरावून घेऊ शकलं नाही. पुढच्या काही सामन्यात विराट कोहलीकडे कॅप कायम राहील असंच सध्यातरी दिसतंय.

IPL 2024, Orange Cap : चेन्नई कोलकात्याच्या सामन्यानंतरही विराट कोहलीची कॅप शाबूत, वाचा कोण कुठे ते
| Updated on: Apr 08, 2024 | 11:03 PM

आयपीएल स्पर्धा एक एक सामना करत रंगतदार वळणावर येत चालली आहे. प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर प्लेऑफची शर्यत चुरशीची होत चालली आहे. तर ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठीही खेळाडूंची चढाओढ सुरु झाली आहे. पण विराट कोहलीची एकूण धावसंख्या पाहता पुढच्या काही सामन्यात तिथपर्यंत पोहोचणं कठीण आहे. विराट कोहलीने पुढच्या काही सामन्यात अशीच चमकदार कामगिरी केली तर तिथपर्यंत पोहोचणं कठीण होत जाईल. विराट कोहलीने 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या जोरावर 316 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आहे. त्याने 5 सामन्यात 191 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे यात एकही अर्धशतक किंवा शतक नाही. तिसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग आहे. त्याने 4 सामन्यात दोन अर्धशतकांच्या जोरावर 185 धावा केल्या आहेत.

चौथ्या स्थानावर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आहे. त्याने पाच सामन्यात एका अर्धशतकासह 183 धावा केल्या. तर पाचव्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्सचा निकोलस पुरन आहे. त्याने चार सामन्यात एका अर्धशतकाच्या जोरावर 178 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि साई सुदर्शन यांच्यातील धावांचं अंतर हे 125 धावांचं आहे. ही धावसंख्या टी20 सामन्यात खूपच मोठी आहे. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचणं पुढच्या काही सामन्यात कठीण आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 138 धावांचं आव्हान ठेवलं. कोलकात्याने 20 षटकात 9 गडी गमवून 137 धावा केल्या. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने सहज गाठलं. 7 गडी गमवून 17.4 षटकात या धावा पूर्ण केल्या. चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. तर फलंदाजांनी सावधपणे खेळत विजश्री खेचून आणला. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने साजेशी खेळी करत नाबाद 64 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थीक्षाना