
आयपीएल 2024 स्पर्धेत रविवारी दोन सामने पार पडले. या दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर आयपीएल गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ भिडले. या दोन्ही सामन्यातील निकाल शेवटच्या टप्प्यात खूपच महत्त्वाचे ठरले आहे. चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सला 28 धावांनी पराभूत करत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांना मात देत तिसरं स्थान गाठलं आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केलं आहे. कोलकात्याने लखनौला 98 धावांनी पराभूत केलं. आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचे प्रत्येकी 16 गुण झाले आहेत. आयपीएलच्या गणितात 16 गुण क्वॉलिफाय होण्यात पुरेसे असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे काही गणित सोडता या दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये एन्ट्री मारल्यात जमा आहे.
चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या वाटेला पहिल्यांदा फलंदाजी आली. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 9 गडी गमवून 167 धावा केल्या. तर पंजाबचा संघ 139 धावा करू शकला. 28 धावांनी विजय झाल्याने चेन्नईच्या नेट रनरेटमध्ये जबर फायदा झाला आहे. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 6 गडी गमवून 235 धावा केल्या. तसेच विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं. तर लखनौ सुपर जायंट्सला फक्त 137 धावा करता आल्या. या विजयामुळे लखनौचं मात्र नुकसान झालं आहे. तर कोलकात्याने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स 16 आणि +1.453 नेट रनरेटसह पहिल्या , राजस्थान रॉयल्स 16 गुण आणि +0.622 नेट रनरेटसह दुसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स 12 गुण आणि +0.700 नेट रनरेटसह तिसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद 12 आणि +0.072 नेट रनरेटसह चौथ्या, लखनौ सुपर जायंट्स 12 गुण आणि -0.371 नेट रनरेटसह पाचव्या, दिल्ली कॅपिटल्स 10 गुण आणि -0.442 नेट रनरेटसह सहाव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु 8 गुण आणि -0.049 नेट रनरेटसह सातव्या, पंजाब किंग्स 8 गुण आणि -0.187 नेट रनरेटसह आठव्या, गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.320 नेट रनरेटसह नवव्या आणि मुंबई इंडियन्स 6 गुण आणि -0.356 नेट रनरेटसह दहाव्या स्थानावर आहे.