तीन वर्षांनंतर IPL ऑक्शन आता भारतात होणार; तारीख अन् ठिकाण काय? अध्यक्षांनी दिली माहिती
आयपीएलच्या 20व्या हंगामासाठी तयारीला वेग आला असून, आगामी मिनी ऑक्शन भारतातच होणार असल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमल यांनी दिली आहे.

आयपीएलच्या 20व्या हंगामाची आता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलचे गेले तीन हंगाम हे भारताबाहेरच आयोजित करण्यात आलेले. आता परत एकदा आयपीएलचे नियोजन भारतात होणार आहे. आयपीलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमल यांनी मोठी घोषणा केली आहे. आता त्यांनी सागितलं की, आगामी मिनी ऑक्शन गोव्यामध्ये केलं जाणार आहे. याचसोबत त्यांनी ऑक्शनच्या तारखांबद्दलही मोठा खुलासा केला आहे. आयपीएल म्हणजे भारतीय क्रिकेटप्रेमीचा जीव की प्राण आहे. त्यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम कधी आणि त्याच्या तारखा काय याची प्रतिक्षा आता लागलेली आहे. त्यातच नव्या हंगामाच्या ऑक्शनबद्दलची नवी माहिती आयपीएलचे अध्यक्षांनी दिली आहे.
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांच्या मते, लिलावासाठी डिसेंबरमधील तारखांचा विचार केला जात असून, तो 15-16 डिसेंबरच्या सुमारास होण्याची दाट शक्यता आहे. हा ‘मिनी-लिलाव’ असल्याने, खेळाडूंच्या बोली लावण्याची संपूर्ण प्रक्रिया एकाच दिवसात पूर्ण केली जाईल.
दरम्यान आयपीएलचे नियोजन गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या देशांमध्ये केलं जात आहे. गेले तीन हंगामांचे लिलावही दुबई, जेद्दाह आणि अबू धाबी येथे झाले होते. त्यामुळे लिलाव पुन्हा भारताततच आयोजित करण्याचा निर्णय मंडळाने जाणीवपूर्वक आणि सखोल विचार करून घेतल्याचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी सांगितले आहे. दरम्यान, भारतात लग्नसराईच्या काळात मोठ्या शहरांमधील हॉटेल्स आणि कार्यक्रमाच्या ठिकाणांना सहसा मोठी मागणी असते, परंतु ‘मिनी-लिलावा’चे स्वरूप लहान असल्याने त्यासाठी गोव्याची निवड करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
त्यामुळे आता शेकडो खेळाडूंसाठी चालणाऱ्या मेगा लिलावाच्या तुलनेमध्ये आता मिनी लिलावात फ्रँचायझींना फक्त त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार काही मोजक्याच जागा भरायच्या असतात. यात सर्व फ्रँचायझी आपल्या संघाचा मुख्य गोष्टी कायम राखून रिक्त जागा भरण्यासाठी खेळाडूंवर बोली लावतील. ही प्रक्रिया अत्यंत रोमांचक असणार असून, यामध्ये देशांतर्गत आणि नॅशनल लेव्हलवरील स्टार खेळाडूंवर नेहमीप्रमाणेच कोट्यवधी रुपयांची उधळण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.