
आयपीएल 2024 स्पर्धेतील 57 वा सामना एकतर्फी झाला असंच म्हणावं लागेल. कारण सनरायझर्स हैदराबाद संघाने लखनौची सर्वच रणनिती धुळीस मिळवली. स्ट्रॅटर्जी टाईममध्ये जाण्याचही उसंत दिली नाही. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा जोडीने लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. पॉवर प्लेमध्ये तर अक्षरश: सोलून काढलं. पॉवर प्लेच्या 6 षटकांमध्ये नाबाद 107 धावा केल्या. यासह सनरायझर्स हैदराबाद आपला विक्रम मोडण्यापासून वाचला. यापूर्वी दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पॉवरप्लेमध्ये 125 धावा केल्या होत्या. कृष्णप्पा गोथमने पहिलं षटक टाकलं त्याने 7 धावा दिल्या. दुसरं षटक यश ठाकुरने टाकलं यात एकूण 17 धावा आल्या. तिसरं षटक पुन्हा कृष्णपा गोथमने टाकलं आणि 22 धावा दिल्या. रवि बिष्णोईच्या चौथ्या षटकात 17 धावा आल्या. नवीन उल हकच्या पाचव्या षटकात 23 धावा आल्या. तर यश ठाकुरने टाकलेल्या सहाव्या षटकात 20 धावा आल्या. धावांचा डोंगर रचला जात असताना एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने 2 आणि कमिन्सने एक विकेट घेतली. मात्र पर्पल कॅपच्या टॉप 5 मध्ये काही एन्ट्री मिळाली नाही.
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 12 सामन्यात 47.5 षटकं टाकत 297 धावा दिल्या आणि 18 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 6.20 आहे. दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा हर्षल पटेल आहे. त्याने 11 सामन्यात 37 षटकं टाकत 362 धावा दिल्या आणि 17 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 9.78 इतका आहे. कोलकात्याचा वरुण चक्रवर्ती याने 11 सामन्यात 40 षटकं टाकतं 350 धावा देत 16 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 8.75 आहे. चौथ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा टी नटराजन आहे. त्याने 10 सामन्यात 39.2 षटकं टाकली आणि 368 धावा देत 15 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट 9.35 आहे. पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंग पाचव्या स्थानी आहे. त्याने 11 सामन्यात 39.2 षटकं टाकत 396 धावा दिल्या आणि 15 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट 10.06 आहे.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत फक्त एक विजय दूर आहे. उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला की स्थान पक्कं होईल. हैदराबादचा नेट रनरेटही चांगला आहे. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 165 धावा केल्या आणि विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान हैदराबादने एकही गडी न गमवता 9.4 षटकात पूर्ण केलं.