
रोहित शर्माने टी20 आणि कसोटी संघातून निवृत्ती घेतली आहे. आता फक्त वनडे सामने खेळताना दिसणार आहे. असं असातना एका निर्णयामुळे धाबे दणाणले आहेत. आता खेळाडूंसाठी लवकरच Bronco टेस्ट लागू केली जाणारी आहे. ही टेस्ट पास केल्यानंतरच खेळाडूला संघात जागा मिळणार आहे. पण दुसरीकडे माजी क्रिकेटपटूने या टेस्टबाबत शंका व्यक्त केली आहे. माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांच्या मते, रग्बी स्टाइलचा ब्रोंको टेस्ट सुरू करण्याचा निर्णयाच्या माध्यमातून रोहित शर्मासारख्या खेळाडूला बाहेर बसवण्याचा प्रयत्न आहे. 38 वर्षीय रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. पण या ब्रोंको टेस्टमुळे फेल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संघात जागा मिळणार नाही.
मनोज तिवारीने क्रिकट्रॅकरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ब्रोंको टेस्ट वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मासमोर अडचणींचा डोंगर उभा करेल. ‘2027 वनडे वर्ल्डकप योजनेतून विराटला बाहेर करणं कठीण आहे. पण मला शंका आहे की रोहित शर्माला यात सहभागी केलं जाईल. कारण भारतीय क्रिकेटमध्ये जे काही सध्या दिसत आहे, त्यावरून असंच वाटते. माझ्या मते, ब्रोंको टेस्ट काही दिवसांपूर्वी सुरु केली आहे. ही टेस्ट रोहित शर्मा आणि त्याच्या सारख्या इतर खेळाडूंसाठी आहे, ज्यांना संघ व्यवस्थापन भविष्यात संघाचा भाग बनवू इच्छित नाही.’
मनोज तिवारीने पुढे सांगितलं की, ‘तुम्हाला माहिती आहे का ब्रोंको टेस्ट कठीण फिटनेस टेस्ट पैकी एक आहे. पण प्रश्न असा आहे की आताच का आणली जात आहे. जेव्हा नव्या हेड कोचला पहिल्या मालिकेची जबाबदारी मिळाली होती, तेव्हा का लाँच केली नाही. हा नेमका कोणाचा विचार आहे. काही दिवसांपूर्वी ही टेस्ट कोणी लागू केली. हा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण जर रोहितने फिटनेसवर कठोर मेहनत घेतली नाही तर पुढे कठीण होईल. मला वाटतं की ब्रोंको टेस्ट त्याच्यासाठी अडसर ठरेल.’
भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच अँड्र्यूज ली रूच्या सूचनेनंतर ही टेस्ट लागू करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. यामुळे वेगवान गोलंदाज आणि इतर खेळाडू जिमपेक्षा धावण्यावर लक्ष केंद्रीत करतील, असं त्यांचं मत आहे. ब्रोंको टेस्ट ही रग्बीसाठी घेतली जाणारी फिटनेस टेस्ट आहे. विशेष म्हणजे योयो टेस्टपेक्षा ही खूपच कठीण मानली जाते. ब्रोंको कसोटीत 20 मीटर, 40 मीटर आणि 60 मीटरपर्यंत काही शटल धावण्याचा परीक्षा घेतल्या जातात. ही परीक्षा ठरलेल्या वेळेत पास करावी लागते.