
इशान किशन दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आल्यानंतर त्याच्या नशिबाचे तारेच फिरले. नोव्हेंबर 2023 पासून भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तेव्हापासून इशान किशन टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. . मात्र अजूनही त्याला संधी मिळालेली नाही. आता त्याची भविष्यातील क्रिकेट कारकीर्द आता देशांतर्गत क्रिकेटवर अवलंबून आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली तरच त्याचा टीम इंडियात विचार केला जाऊ शकतो. रणजी स्पर्धा सुरु असून झारखंड विरुद्ध तामिळनाडू यांच्यात सामना सुरु आहे. कोयंबतूरच्या श्री रामकृष्ण कॉलेज ऑफ आर्ट्स अँड अँड सायंस मैदानात हा सामना होत आहे. या सामन्यात इशान किशनने जबरदस्त खेळी केली. तसेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अजीत आगरकर यांची अटही पूर्ण केली आहे. त्यामुळे इशान आता टीम इंडियाच्या दारावर उभा असून त्याने पुन्हा एकदा दार ठोठावलं आहे.
आयपीएल 2025 नंतर इंग्लंड दौऱ्यात त्याची निवड होईल असं वाटलं होतं. पण त्याला डावलण्यात आलं. इतकंच काय वेस्ट इंडिज दौऱ्यातही संधी मिळाली नाही. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची निवड झाली, पण इशान किशनच्या नावाचा विचारही केला गेला नाही. दरम्यान, वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केल्यानंतर अजित आगरकर यांना इशान किशनच्या निवडीबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने सांगितलं की, ‘इंडिया ए संघात निवड केली तेव्हा इशान किशन फिट नव्हता. त्यामुळे जगदीशन संघाचा भाग होता. आता इशानला पुनरागमनासाठी आणखी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ‘
अजित आगरकर यांच्या वक्तव्यातून स्पष्ट आहे की, इशान किशनला देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करण्याशिवाय पर्याय नाही. इशान किशनने ही बाब लक्षात घेऊन रणजी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली. तामिळनाडूविरुद्ध 134 चेंडूत शतक ठोकलं. त्यात 12 चौकार आणि 2 षटकार मारले. इशान किशन जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा संघाची स्थिती 3 बाज 79 धावा अशी होती. त्यानंतर त्याने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करून डाव सावरला.