प्रजासत्ताक दिनाच्या 3 दिवस आधी या शहरात सर्व शाळांना सुट्टी, नेमकं कारण काय?
राज्यातील या शहरामध्ये 23 जानेवारी रोजी सर्व खाजगी आणि सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नेमकं कारण काय?

Pune News : पुणे शहरात नेहमी अनेक वेगवेगळ्या स्पर्धा या होत असतात. पुण्यात अनेक ठिकाणांहून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. अशातच आता पुण्यात एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या पुणे शहरात सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा बजाज पुणे ग्रँड टूर 2026 च्या पार्श्वभूमीवर शुक्रवार 23 जानेवारी 2026 रोजी पुणे शहरातील सर्व सरकारी व खासगी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची सर्व माहिती पुणे शहर पोलीस दलाचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे.
कारण 23 जानेवारी रोजी या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा हा पुणे शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणांहून जाणार आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी पोलिसांनी पुण्यातील काही ठिकाणचे मार्ग बदलले आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पुणे पोलिसांनी सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
किती तासांसाठी रस्ते असणार बंद?
अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पुणे शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर वाहतूक नियंत्रित स्वरूपात चालू राहणार आहे. स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहेत. यामध्ये एका रस्त्याचा बंद कालावधी हा साधारणत 30 मिनिटांपेक्षा जास्त नसेल. मात्र स्पर्धकांच्या हालचालींमुळे वारंवार वाहतूक थांबवली जाण्याची शक्यता आहे.
या सायकल स्पर्धेच्या मार्गामुळे राधा चौक, बाणेर रोड, पाऊड रोड, कर्वे रोड, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, स्वारगेट, टिळक रोड, मार्केट यार्ड, कॅम्प आणि कोंढवा या परिसरांमध्ये विशेष वाहतूक नियंत्रण लागू राहणार आहे. नागरिकांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून शक्य असल्यास या भागांतील प्रवास लोकांनी टाळावा असं आवाहन देखील वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाचे आवाहन
नागरिकांनी आपला प्रवास आधीच नियोजित करावा तसेच प्रत्यक्ष वेळेतील वाहतूक माहिती व अपडेट्ससाठी पुणे पोलिसांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स यांना भेट द्यावी असे देखील आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अन्य आपत्कालीन सेवा वाहनांना सर्व मार्गांवरून पूर्ण मुभा दिली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
