ENG vs IND : बुमराह चौथ्या टेस्टमध्ये खेळणार की नाही? शुबमन गिलने सांगून टाकलं

Shubman Gill on Jasprit Bumrah 4th Test Availability : टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील 5 पैकी फक्त 3 सामन्यांमध्येच खेळणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे बुमराह चौथ्या सामन्यात खेळणार की नाही? जाणून घ्या कर्णधार शुबमन काय म्हणाला?

ENG vs IND : बुमराह चौथ्या टेस्टमध्ये खेळणार की नाही? शुबमन गिलने सांगून टाकलं
Shubman Gill Post Match Presentation
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 14, 2025 | 11:50 PM

भारतीय क्रिकेट संघाला लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अवघ्या 22 धावांनी पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारताला दुसऱ्या डावात 170 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने अखेरपर्यंत नाबाद राहत एकाकी झुंज दिली. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ न मिळाल्याने भारताला या 5 सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना गमवावा लागला. इंग्लंडने या विजयासह 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली.

पहिल्या डावात दोन्ही संघांनी प्रत्येकी 387 धावा केल्या. त्यामुळे पहिला डाव हा बरोबरीत राहिला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी कमाल करत इंग्लंडला 192 धावांवर रोखलं. आता भारताला 193 धावांचीच गरज होती. मात्र आघाडीच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. यशस्वी जैस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर करुण नायर, कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या तिघांनीही निर्णायक क्षणी गुडघे टेकले आणि मैदानाबाहेर गेले. केएल राहुल याने झुंज दिली. मात्र केएललाही इंग्लंडने 39 धावांवर बाद केलं.

त्यानंतर जडेजाने नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या त्रिकुटासह जोरदार संघर्ष करत भारताला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. मात्र हे तिघेही आऊट झाले. इंग्लंडने टीम इंडियाला 170 धावांवर रोखलं आणि सामना जिंकला. रवींद्र जडेजाने नाबाद 61 धावा केल्या. नितीशने 13, सिराजने 4 तर बुमराहने 5 धावा केल्या.

तसेच बुमराहने या सामन्यात एकूण 7 विकेट्स घेतल्या. बुमराहने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या. बुमराहचा या मालिकेतील हा दुसरा सामना होता. बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे या मालिकेत फक्त 3 सामनेच खेळणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यात टीम इंडिया आता 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे बुमराह चौथ्या सामन्यात खेळणार की नाही? असा प्रश्न कर्णधार शुबमन गिल याला प्रेंझेटेटरने केला. यावर शुबमनने एकाच वाक्यात उत्तर देत विषय संपवला.

शुबमन गिल काय म्हणाला?

“बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार की नाही हे तुम्हाला लवकरच कळेल”, असं शुबमनने पोस्टमॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हटलं. त्यामुळे आता बुमराह चौथ्या सामन्यात खेळणार की नाही? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. उभयसंघातील चौथा कसोटी सामना हा 23 जुलैपासून एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे होणार आहे.