
टीम इंडियाचे खेळाडू गेल्या काही दिवसात सराव कमी आणि विदेशी दौऱ्यावर कुटुंबासोबत मौजमस्ती करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे बीसीसीआयने कठोर पावलं उचलली आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाची कामगिरी पाहून बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत बीसीसीआयने थेट नियम घालून दिले आहेत. बीसीसीआयने 16 जानेवारील 10 नियम खेळाडूंसाठी जारी केले आहेत. बीसीसीआयने पुन्हा एकदा जुन्या नियमाला फोडणी दिली आहे. यात खेळाडूंना आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त 14 दिवस राहण्याची परवानगी असेल. जर हा दौरा 45 दिवसांपेक्षा अधिक लांबलचक असेल तरच..रिपोर्टनुसार, काही खेळाडू टीम मीटिंग आणि प्लानिंग सत्रात गैरहजर राहात असल्याने हा निर्णय घेतला गेला आहे. असं असताना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने मंगळवारी एक प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्याने अप्रत्यक्षरित्या बीसीसीआयच्या नव्या नियमांवर बोट ठेवलं आहे. जोस बटलरने सांगितलं की, ‘कुटुंब सोबत असेल तर क्रिकेटवर काहीच परिणाम होत नाही. हे मॅनेज केलं जाऊ शकतं.’ बटलरच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. जोस बटलरने टी20 मालिका सुरु होण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत भाष्य केलं.
‘मला वाटतं की, हे खूप महत्त्वाचं आहे. आज आपण ज्या काळात जगत आहोत. ते एक आधुनिक जग आहे आणि आपल्यासोबत विदेश दौऱ्यावर कुटुंबाला घेऊन जाणं चांगली गोष्ट आहे. याचा आनंद लुटला पाहीजे. मला नाही वाटत की यामुळे क्रिकेटवर काही प्रभाव पडेल. हे असं काही की ते आरामात मॅनेज केलं जाऊ शकतं.’, असं इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने सांगितलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात बुधवारपासून टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनर मैदानावर होणआर आहे. पाच सामन्यांची टी20 मालिका संपल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होईल.
बीसीसीआयने सर्व खेळाडूंना टीम बसचा वापर करणं अनिवार्य केलं आहे. बीसीसीआयने आपल्या आदेशात याबाबत स्पष्टपणे गोष्टी नमूद केल्या आहेत. ‘सर्व खेळाडूंकडू अपेक्षा आहे की, मॅच आणि सराव सत्रावेळी टीमसोबत प्रवास करतील. शिस्त आणि टीममध्ये एकजूट ठेवण्यासाठी कुटुंबासोबत वेगळा प्रवास करता येणार नाही.’