
भारत-बांगलादेश यांच्यातील वाढता तणाव पाहता मुस्तफिजुर रहमान याची आयपीएलच्या 19 व्या मोसमातून हकालपट्टी करण्यात आली. रहमानवरील या कारवाईनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आक्रमक झाला आहे. मुस्तफिजुरच्या हकालपट्टीमुळे अचानक बीसीबीला बांगलादेशी खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा आठवला. मुस्तफिजुरवरील कारवाईनंतर बीसीबीने सुरक्षेचं कारण पुढे करत थेट आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येणार नसल्याचं आयसीसीला पत्राद्वारे कळवलं.
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद हे भारताकडे आहे. तर श्रीलंका सहयजमान आहे. बीसीबीने आयसीसीला पत्राद्वारे ते भारतात वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने खेळणार नसल्याचं कळवलं आहे. तसेच बांगलादेशचे सामने भारताऐवजी सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, अशी विनंती बीसीबीने आयसीसीला केली आहे. भारत यजमान असला तरी इथे सामने खेळण्यासाठी न आल्यास बांगलादेशलाच आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करणं यजमान देशासाठी किती खार्चिक असतं? यजमान देशाला नक्की कोणत्या गोष्टीचं आयोजन करावं लागतं? तसेच बांगलादेश भारतात न आल्यास त्यांना किती तोटा सहन करावा लागू शकतो? हे या निमित्ताने आपण जाणून घेऊयात.
वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद भूषवणाऱ्या देशाला चांगलाच खर्च करावा लागतो. भारतात 2023 साली एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा वर्ल्ड कप स्पर्धेतील एका मॅचची फक्त ब्रॉडकास्टिंग वॅल्यू ही अंदाजे 138.7 कोटी रुपये इतकी असल्याचं बीसीसीआय आणि आयसीसीने स्पष्ट केलं होतं. हा फक्त एका सामन्याचा ब्रॉडकास्टिंगचा अंदाजे खर्च. त्याव्यतिरिक्त यजमान देशाला वर्ल्ड कप स्पर्धेआधी स्टेडियमची डागडुजी करावी लागते.
आयसीसीच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदासाठी काही अटी आणि निकष आहेत. त्यानुसार बीसीसीआयने 2023 च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी आयसीसीचे निकष पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी 50 कोटी खर्चे केले होते. यजमान देशाकडून बहुतांश खर्च हा स्पर्धेसाठी केला जातो. त्यामुळे एका सामन्यासाठी एकूण किती कोटी रुपये खर्च होतात? हे अचूक किंवा अंदाजे सांगता येत नाही.
यजमान देशाला अर्थात क्रिकेट बोर्डाला स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येक संघाच्या राहण्याचा, खाण्याचा आणि प्रवासाचा खर्च करावा लागतो. त्यानुसार पंचतारांकीत हॉटेल, प्रवासासाठी खासगी बसेस आणि सरावासाठी मैदान याची सोय करावी लागते. तसेच खेळाडूंची सुरक्षा हा मुख्य मुद्दा असतो. त्यामुळे क्रिकेट बोर्डाला सुरक्षेसाठी सामन्याच्या संबधित ठिकाणी राज्य सरकारसह समन्वय साधावा लागतो.
भारतात वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न आल्यास बीसीसीआयला नाही तर बांगलादेशला फटका बसेल. संबंधित संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील नियोजित सामने खेळण्यास नकार दिल्यास ठराविक रक्कम आणि बक्षिस राशी मिळत नाही. त्यामुळे बांगलादेशला भारतात न येणं चांगलंच महागात पडू शकतं.
तसेच बांगलादेशने भारतात ऐनवेळेस येण्यास नकार दिल्यास त्यांच्या विश्वासहर्तेवर प्रश्न उपस्थित होतील. त्याचे परिणाम संबंधित संघाला द्विपक्षीय मालिकेत किंवा बहुरराष्ट्रीय स्पर्धेत भोगावे लागू शकतात.
बांगलादेश भारतात वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न येण्यावर ठाम आहे. बांगलादेश न आल्यास भारताला वेळापत्रकात ठिकाण बदलावं लागेल. त्यामुळे बीसीसीआय आणि आयसीसीला जाहीरातीतून मिळणारी रक्कम काही प्रमाणात कमी मिळेल. मात्र बीसीसीआय ती तूट आयपीएल आणि इतर स्पर्धेतून भरुन काढू शकते.