6,6,6,6,6,6…! संजू सॅमसनकडून षटकारांचा पाऊस, आशिया कप स्पर्धेत प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की?

आशिया कप स्पर्धेतील संघात संजू सॅमसनला जागा मिळाली आहे. पण प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र सध्याच्या फॉर्म पाहता संजू सॅमसनला डावलता येणं कठीण आहे. केरळ लीग स्पर्धेत पुन्हा एकदा झंझावात पाहायला मिळाला.

6,6,6,6,6,6...! संजू सॅमसनकडून षटकारांचा पाऊस, आशिया कप स्पर्धेत प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की?
6,6,6,6,6,6...! संजू सॅमसनकडून षटकारांचा पाऊस, आशिया कप स्पर्धेत प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की?
Image Credit source: X/KCL
| Updated on: Aug 26, 2025 | 6:23 PM

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याने पुन्हा एकदा आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत कोच्चि ब्लू टायगर्स संघाकडून खेळताना संजू सॅमसनने थ्रिसूर टायटन्स संघाची धुलाई केली. या सामन्यात संजू सॅमसनने 46 चेंडूत 89 धावांची वादळी खेळी केली. यात 9 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. या दरम्यान त्याने एका चेंडूवर 13 धावा काढल्या. खरं तर हे कसं शक्य आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. पण एक नो बॉल आणि फ्रीट हिटमुळे हे शक्य झालं. गोलंदाजाने पहिला चेंडू नो टाकला आणि संजूने हा चेंडू सरळ सीमारेषेपार मारला. त्यानंतर फ्री हीटवरही आरपार षटकार मारला. त्यामुळे एकाच चेंडूवर 13 धावा मिळाल्या. संजू सॅमसनने पाचव्या षटकात हा कमाल केला. सिजोमन जोसेफला या षटकात धुतला. संजू सॅमसनला या खेळीमुळे आशिया कप स्पर्धेतील प्लेइंग 11 मध्ये जागा मिळू शकते.

सॅमसनने गंभीर आणि सूर्यकुमारची चिंता वाढवली

रिपोर्टनुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव संजू सॅमसन ऐवजी शुबमन गिलला सलामीला पाठवणार आहे. याबाबत सूर्यकुमार यादवही पत्रकार परिषदेत बोलला होता. त्यामुळे संजू सॅमसनला प्लेइंग 11 च्या बाहेर बसावं लागेल हे जवळपास मानलं जात होतं. पण संजू सॅमसनचा आक्रमक खेळ पाहून आता हे काही शक्य नाही असं दिसत आहे. उलट जितेश शर्मा आणि शुबमन गिलची जागा संकटात आली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता सलामीला शुबमन गिलला संधी मिळते की संजू सॅमसनला? याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

मागच्या सामन्यातही संजू सॅमसनने 51 चेंडूत 121 धावांची वादळी खेळी केली होती. त्या खेळीत संजू सॅमसनने 14 चौकार आणि 7 षटकार मारले होते. त्यानंतर पुढच्या सामन्यात 46 चेंडूत 89 धावांची खेळी केली आहे. संजू सॅमसनने मागच्या दोन सामन्यात एकूण 16 षटकार मारले आहे. केरळ क्रिकेट लीगमध्ये संजू सॅमसन ज्या पद्धतीने खेळत आहे ते पाहता विरोधी संघाच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फुटला आहे. संजू सॅमसन केरळ क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या स्पर्धेत 74 च्या सरासरीने 223 धावा केल्या आहेत.