Roger Federer टेनिस कोर्टवर शेवटची मॅच हरला, पण….
Roger Federer: टेनिस कोर्टवर एक दुर्मिळ दृश्य पहायला मिळालं, जे याआधी कधीच दिसलं नव्हतं.

मुंबई: टेनिस विश्वातील अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररने आज टेनिस कोर्टचा निरोप घेतला. भारतातील रॉजर फेडररचे तमाम चाहते गाढ झोपेत असताना, तो शेवटचा सामना खेळला. लेवर कपच्या कोर्टवर फेडरर शेवटची मॅच खेळला. रॉजर फेडररने त्याच्या करीयरमध्ये पुरुष एकेरीत अनेक किताब जिंकले. मेन्स सिंगल्समधील या बेताज बादशाहने शेवटचा सामना डबल्समध्ये खेळला. या मॅचमध्ये स्पेनचा राफेल नदाल त्याचा जोडीदार होता.
राफेल नदालच्या डोळ्यातही अश्रू
शेवटच्या सामन्याचा निकाल रॉजर फेडररसाठी अनुकूल नव्हता. त्याचा पराभव झाला. पण हरल्यानंतरही रॉजर फेडररने तमान क्रीडाप्रेमींच मन जिंकलं. फेडररला निरोप देताना टेनिस कोर्टवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. रॉजर सोबत खेळणारा त्याचा जोडीदार नदालही यावेळी रडला. त्याशिवाय जोकोविच, मरे आणि अन्य खेळाडूंचे सुद्धा या भावनिक क्षणी डोळे पाणावले होते.
शेवटचा सामना कोणाबरोबर?
20 ग्रँडस्लॅम किताब जिंकणाऱ्या रॉजर फेडररचा शेवटचा सामना Jack Sock आणि Frances Tiafoe च्या जोडी बरोबर होता. फेडरर, राफेल नदाल जोडीने पहिला सेट 6-4 असा जिंकला. कोर्टवर फेडरर आणि नदालचा चांगला ताळमेळ दिसून आला. पण दुसऱ्यासेटमध्ये जॅक-फान्सेस जोडीने जोरदार कमबॅक केलं. त्यांनी दुसरा सेट 6-7 असा जिंकला.
View this post on Instagram
तमाम टेनिसप्रेमींची मन जिंकली
तिसऱ्या सेटमध्ये अटी-तटीचा सामना झाला. कोर्टच्या एकाबाजूला अनुभव होता, तर दुसऱ्याबाजूला जोश. कोणाला एकाला जिंकायचं होतं. इथे अनुभवापेक्षा जोश, उत्साहाची सरशी झाली. जॅक-फ्रान्सेस जोडीने तिसरा सेट 9-11 असा जिंकला. चाहत्यांना रॉजर फेडररला शेवटच्या सामन्यात विजय मिळवताना पहायचं होतं. पण असं झालं नाही. फेडरर मॅच हरला. पण त्याने तमाम टेनिसप्रेमींची मन जिंकली.
