Harbhajan Singh: ‘मी मनातून आधीच…’ निवृत्तीच्यावेळी हे काय म्हणाला हरभजन

| Updated on: Dec 24, 2021 | 3:55 PM

एककाळ हरभजन सिंग सर्व फॉर्मेटमध्ये भारताचा मॅचविनर खेळाडू होता. 2001 मध्ये मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत प्रमुख फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेच्या अनुपस्थितीत त्याने फिरकीचा भारा समर्थपणे पेलला होता.

Harbhajan Singh: मी मनातून आधीच... निवृत्तीच्यावेळी हे काय म्हणाला हरभजन
Follow us on

चंदीगड: “बऱ्याच दिवसांपासून माझ्या मनात निवृत्तीचा विचार घोळत होता. आयपीएल 2021 मोसमाच्यावेळी माझा निवृत्तीचा विचार पक्का झाला” असे हरभजन सिंगने (Harbhajan Singh) निवृत्ती जाहीर केल्यानंतर सांगितले. 41 वर्षीय हरभजनने शुक्रवारी दुपारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली. निवृत्तीचा निर्णय इतका सोपा नव्हता, असे हरभजनने त्याच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर सांगितले. हरभजन मार्च 2016 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून दमदार कामगिरी केल्यानंतर हरभजन कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला.

आयपीएल 2020 च्या लिलावात केकेआरने हरभजनला 2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 2021 मध्ये केकेआरने हरभजनला कायम ठेवले. 2021 च्या सीझनमध्ये हरभजन केकेआरसाठी तीन सामने खेळला. पण या मोसमात हरभजन युवा फिरकी गोलंदाजांसाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसला होता.

“जालंधरच्या रस्त्यावरुन टीम इंडियाचा टर्नबेटर बनण्यापर्यंतचा माझा प्रवास खूप सुंदर होता. आयुष्यात अशी वेळ येते, जेव्हा आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतात. तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असते. ही जाहीर घोषणा करण्यासाठी मी मागची काहीवर्ष वाट पाहत होतो. मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे” असे हरभजनने शुक्रवारी सांगितले.

“मी मनातून आधीच निवृत्त झालो होतो. फक्त आज घोषणा केली. मागच्या काही वर्षांपासून मी क्रिकेट खेळत नव्हतो. कटिबद्धतेमुळे आयपीएलमध्ये  केकेआरसोबत होतो. पण याच मोसमात निवृत्त होण्याचं मी ठरवलं होतं” असं हरभजन म्हणाला.

एककाळ हरभजन सिंग सर्व फॉर्मेटमध्ये भारताचा मॅचविनर खेळाडू होता. 2001 मध्ये मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत प्रमुख फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेच्या अनुपस्थितीत त्याने फिरकीचा भारा समर्थपणे पेलला होता. भारताने ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या संस्मरणीय कसोटी विजयात हरभजन सिंगच्या 32 विकेट महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या. ऐतिहासिक कोलकात्ता कसोटीत हरभजनने 13 विकेट घेतल्या होत्या. यात हॅट्ट्रीकचा समावेश होता.