भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतून दिग्गज खेळाडू बाहेर, कारण की…
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका जूनमध्ये सुरु होणार आहे. या मालिकेसाठी आतापासून मोर्चेबांधणी केली जात आहे. असं असताना एक दिग्गज खेळाडू या स्पर्धेला मुकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नेमकं काय झालं आणि कशासाठी ते जाणून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेनंतर आता टीम इंडिया थेट जून महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या स्पर्धेला अजून दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. दरम्यान आयपीएल 2025 स्पर्धा पार पडणार आहे. असं असताना इंग्लंडच्य गोटातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड चार महिने क्रिकेट खेळणार नाही. याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 13 मार्चला दिली आहे. रिपोर्टनुसार, त्याच्या डाव्या गुडघ्याचं लिगामेंट डॅमेज आहे. स्कॅन आणि सर्जरी केल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे त्याला आराम देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे जून महिन्यात होणाऱ्या भारत इंग्लंड कसोटी मालिकेला मुकणार हे निश्चित झालं आहे. ही मालिका वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025-2027 च्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं की, गेल्या वर्षभर तो दुखापतीमुळे त्रस्त होता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याला हा त्रास अधिक जाणवू लागला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला डाव्या गुडघ्याला दुखापत जाणवली. त्यानंतर त्याला पुढच्या सामन्यात आराम दिला गेला होता. तपासणी केल्यानंतर त्याच्या दुखापतीची पूर्ण माहिती मिळाली आहे. त्याची दुखापत पाहता पुढचे चार महिने क्रिकेट मैदानापासून दूर असणार आहे. जेम्स अँडरसनने निवृत्ती घेतल्यानंतर मार्क वूडच्या खांद्यावर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीची धुरा आहे. तो तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो. त्यामुळे त्याचं संघाबाहेर असणं इंग्लंड टीमला धक्का आहे.
भारत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान ही मालिका असणार आहे. मालिकेसाठी अजून तीन महिन्यांचा अवधी आहे. पण मार्क वूडला बरं होण्यासाठी 4 महिने लागतील. त्यातही सावरणं गरजेचं आहे. त्यामुळे भारत इंग्लंड मालिकेला मुकणार आहे. दुसरीकडे, मार्क वूडची कामगिरी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत निराशाजनक राहिली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तर 8 षटकात 50 धावा दिल्या होत्या.