
आयपीएल 2025 स्पर्धेतली 69वा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यातही सूर्यकुमार यादवचा झंझावात पाहायला मिळाला. पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 57 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला 20 षटकात 7 गडी गमवून 184 धावांपर्यंत मजल मारता आली. सूर्यकुमार यादवने 34 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. तसेच 39 चेंडूत 57 धावांची खेळी करून अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आयपीएल करिअरमधील हे 29वं अर्धशतक आहे. तर पंजाब किंग्सविरुद्ध त्याने पाचवं अर्धशतक ठोकलं आहे. यासोबत पर्वातील सूर्यकुमार यादवने ठोकलेलं हे पाचवं अर्धशतक आहे. या अर्धशतकीय खेळीत सूर्यकुमार यादवने काही विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार यादव हा अव्वल स्थानी आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी एका पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 2010 आयपीएल स्पर्धेतील 15 सामन्यात 618 धावा केल्या होत्या. आता विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर झाला आहे. सूर्यकुमार यादवने या पर्वात 640 धावा केल्या आहेत. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन 679 धावांसह पहिल्या, तर शुबमन गिल 649 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
अर्धशतकी खेळी केल्यानंतर सूर्यकुमार यादवने आपलं मत व्यक्त केलं. पहिल्या डावानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘या खेळपट्टीवर खेळणे थोडे आव्हानात्मक होते. वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांमुळे ते थोडे कठीण वाटत होते, ते ठीक होते. हार्दिक आणि नमनने सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती लय तुटल्याने आम्हाला 10-15 धावा कमी पडल्या असे मला वाटते. वेगवान गोलंदाजी आणि चांगले सीम-अप चेंडू हे फलंदाजांसाठी एक आव्हान असेल. या विकेटसाठी आमचा चांगला स्कोअर आहे, ते एक आव्हान असेल. जर आपण जिंकलो तर नक्कीच माझ्या खेळीवर आनंद होईल. आवडते शॉट्स स्क्वेअर लेगवर स्वीप आणि फ्लिक होते, यावेळी चांगली फलंदाजी करत आहे.’