
भारतीय महिला संघाने काही आठवड्यांआधी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय महिला संघाने एकत्र जल्लोष केला. मात्र काही आठवड्यांआधी एकत्र खेळत असलेले हे सहकारी खेळाडू आता डब्ल्यूपीएल स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमाला 9 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील सलामीच्या सामन्याचा थरार नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये रंगणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. हरमनप्रीत कौर मुंबईचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. तर स्मृती मंधाना हीच्याकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. मुंबई आणि आरसीबी दोन्ही चॅम्पियन टीम आहेत. मुंबईने 2 तर आरसीबीने 1 ट्रॉफी जिंकली आहे.
मुंबई इंडियन्ससमोर या हंगामात ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. तसेच मुंबईने टीममधील प्रमुख खेळाडू कायम ठेवले आहेत. मुंबई टीममध्ये कॅप्टन हरमनप्रीत व्यतिरिक्त नॅट सायव्हर ब्रँट आणि हेली मॅथ्यूज सारखे दिग्गज खेळाडू आहेत. अमेलिया केर, मिली एलिंगवर्थ आणि अमनजोत कौर यांच्यावर मिडल आणि लोअर ऑर्डरची जबाबदारी असेल. तसेच शब्निम इस्माइल आणि साइका इशाक या दोघींवर गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.
स्मृतीवर नेतृत्वासह आरसीबीला धमाकेदार सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असणार आहे. तसेच ग्रेस हॅरीस, नादिन डी क्लर्क आणि जॉर्जिया वेयरहम या त्रिकुटावर मोठी खेळी करण्याची जबाबदारी असेल. विकेटकीपर ऋचा घोष ही फिनिशर म्हणून धमाका करण्यासाठी सज्ज आहे. अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर आणि लॉरेन बेल या तिघी वेगवान गोलंदाजीची मदार सांभाळणार आहेत. तर श्रेयांका पाटील आणि लिन्से स्मिथ ही जोडी फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला गुंडाळण्यासाठी प्रयत्नशील असतील.
मुंबई-आरसीबी सामन्यात चाहत्यांना हरमनप्रीत कौर विरुद्ध स्मृती मंधाना अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार आणि उपकर्णधार असलेली ही जोडी डब्ल्यूपीएलमध्ये एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात उतरणार आहेत.
मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांचा डब्ल्यूपीएल स्पर्धेत आतापर्यंत 3 मोसमात एकूण 7 वेळा आमनासामना झाला आहे. मुंबईने आरसीबी विरुद्ध 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर आरसीबीने मुंबईवर 3 सामन्यांमध्ये मात केली आहे.