
दुखापतीनंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मोहम्मद शमीचं कमबॅक फार काही चांगलं झालं नाही. त्याला पुन्हा एकदा लय मिळवण्यासाठी धडपड करावी लागली. पण चॅम्पियन्स ट्रॉफीत मोहम्मद शमीचा जलवा पुन्हा एकदा दिसला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने पाच विकेट घेतले. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीला पुन्हा एकदा धार मिळाल्याचं दिसत आहे. मोहम्मद शमी पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सौम्या सरकारला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर संघाच्या सातव्या षटकात मेहदी हसनला 5 धावांवर चालतं केलं. मोहम्मद शमीने पॉवर प्लेमध्ये दोन विकेट घेतल्या. पण तो प्रत्येक विकेटनंतर फ्लाईंग किस सेलीब्रेशन करत होता. त्यामुळे त्याचं असं सेलीब्रेशन करण्याचं कारण काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण त्या मागचा खुलासा आता खुद्द मोहम्मद शमीने केला आहे.
मोहम्मद शमीने सांगितलं की हा स्पेल मी माझ्या वडिलांना डेडिकेट केला आणि यासाठी असं करत होतो. शमीच्या वडिलांचं 2017 मध्ये निधन झालं होतं. शमीने सांगितलं की, ‘हे माझ्या वडिलांसाठी होतं. ते माझे रोल मॉडल आहेत. ते कायम माझ्यासोबत माझ्या मदतीसाठी असायचे.’ मोहम्मद शमीने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचेही आभार मानले. ‘कर्णधार असो की प्रशिक्षक, प्रत्येक खेळाडूसाठी पाठिंबा खूपच महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धेसाठी प्लान करता तेव्हा अशा खेळाडूंवर तुम्ही विश्वास टाकता. यासाठी कर्णधार आणि टीमला मानसिक शांती लाभते. मी कायम सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करतो.’, असंही शमी पुढे म्हणाला.
मोहम्मद शमीने 10 षटकात 53 धावा देत 5 गडी बाद केले. यासह त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले. याबाबत बोलताना मोहम्मद शमी म्हणाला की, ‘तुमच्या नशिबात जितकं आहे तितकं तुम्हाला देव देतो. माझ्याकडे जबाबदारी सोपवली आहे. मी ती जबाबदारी पार पाडत आहे का? याबाबत जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो. मला रेकॉर्डबाबत माहिती नाही, जो आता तुम्ही सांगितला. असे रेकॉर्ड प्रत्येकाच्या आयुष्यात यावेत.’