
देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेला (Vijay Hazare Trophy) दणक्यात सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्याच दिवशी 20 पेक्षा अधिक फलंदाजांनी शतकं झळकावली. तर एकाने द्विशतकही केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली या टीम इंडियाच्या दिग्गज जोडीनेही शतक करत या स्पर्धेत जोरदार कमबॅक केलं. रोहित आणि विराट या दोघांनी शतक करत चाहत्यांची मनं जिंकली. मात्र रोहित या स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात उत्तराखंड विरुद्ध अपयशी ठरला. रोहित झिरोवर आऊट झाला. तर विराटने पहिल्या सामन्यातील शतकानंतर दुसर्या मॅचमध्ये धमाका सुरु ठेवला.
विराटने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. विराटने पहिल्या सामन्यात 137 तर दुसऱ्या मॅचमध्ये 77 धावा केल्या. विराट कोहली अशापक्रारे पहिल्या 2 सामन्यांत एकूण 208 धावा केल्यात. मात्र 5 असे फलंदाज आहेत जे धावांबाबत विराटच्या फार पुढे आहेत. त्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.
कर्नाटक टीमकडून खेळणाऱ्या ओपनर देवदत्त पडीक्कल याने या मोसमातील पहिल्या 2 सामन्यात सलग 2 शतकं झळकावली आहेत. देवदत्तने 135.50 च्या सरासरीने एकूण 271 धावा केल्या आहेत. देवदत्त या मोसमात सर्वाधिक धावा करणारा नंबर 1 फलंदाज आहे. देवदत्तने या 2 सामन्यांमध्ये 22 चौकार आणि 10 षटकार लगावले आहेत.
ध्रुव शौरे या विदर्भाच्या पोट्ट्यानेही धमाका केल्या. ध्रुवने 2 सामन्यांत 2 शतकांसह एकूण 245 धावा केल्या आहेत. ध्रुवने 2 सामन्यांत 27 चौकार आणि 6 षटकार लगावले आहेत.
सौराष्ट्रच्या समर गज्जर याने पहिल्या 2 सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा केल्यात. समरने 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 215 धावा केल्या आहेत. समरची 132 ही या मोसमातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या राहिली आहे. तसेच समर या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
यूपीचा विकेटकीपर बॅट्समन आर्यन जुयाल याने 2 सामन्यांमध्ये एकूण 214 धावा केल्या आहेत. आर्यनने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे. आर्यनने 2 सामन्यांमध्ये 9 षटकार आणि 16 चौकार लगावले आहेत.
ओडीसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्वास्तिक पीपी समाल याने 2 सामन्यांत 212 धावा केल्या आहेत. स्वास्तिकने एकाच सामन्यात द्विशतक करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र स्वास्तिक दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला.